पुणे सोलापूर एक्सप्रेस वे तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी- योगेश राऊत

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आणि हरित भविष्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुणे सोलापूर एक्सप्रेस वे तर्फे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली.
कार्यक्रमादरम्यान विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असल्याचा संदेश उपस्थितांना देण्यात आला. तसेच प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्पही केला.
या उपक्रमात फणी कुमार मुला, सुरजीत सिंग, मौली चल्लमचार्ला, अमर सपाटे, प्रविण कांबळे, वसीम शेख,गुलाब शेख प्रल्हाद रोटे, विलास मोलावडे, अमोल बंडगर,अक्षय नरुटे यांच्यासह प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांनी एकत्रितपणे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याची शपथ घेतली.
यावेळी “एक झाड लावा, उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशेचे बीज रुजवा” हा संदेश देत पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
पुणे सोलापूर एक्सप्रेस वे ने या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाबाबतची आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




