विठ्ठलवाडीत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा भव्य सत्कार प्रगतशील शेतकरी, पत्रकार आणि पर्यावरणप्रेमींच्या कार्याचा गौरव “शेतजमीन वाचवा, पर्यावरण जपा” — संभाजी गवारे यांचे प्रेरणादायी आवाहन

विठ्ठलवाडीत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा भव्य सत्कार
प्रगतशील शेतकरी, पत्रकार आणि पर्यावरणप्रेमींच्या कार्याचा गौरव
“शेतजमीन वाचवा, पर्यावरण जपा” — संभाजी गवारे यांचे प्रेरणादायी आवाहन

पक्षी संवर्धन, उत्कृष्ट पत्रकारिता आणि आधुनिक शेतीला मानाचा मुजरा
विठ्ठलवाडी सोसायटीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
शेतजमीन वाचवा, पर्यावरण जपा आणि गाव पर्यटनाच्या दिशेने घडवा — संभाजी गवारे यांचे प्रेरणादायी विचार

पुणे प्रतिनिधी : संजय चव्हाण

नागरगावं – तळेगाव ढमढेरे परिसरातील श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे विठ्ठलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. समाजकार्य, शेती, पत्रकारिता, पर्यावरण आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांचा शाल, श्रीफळ व फेटा देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शेती क्षेत्रातील प्रगतशील शेतकरी रायचंद शिंदे, पत्रकार क्षेत्रातील शेरखान शेख, पर्यावरण क्षेत्रातील प्रवीणकुमार जगताप तसेच सोसायटी क्षेत्रातील संस्थेचे सचिव सुदेश शीलवंत यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील प्रगतशील शेतकरी रायचंद शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत बाजरीचे हेक्टरी ६५.५२ क्विंटल इतके विक्रमी उत्पादन घेतले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. त्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
पत्रकार शेरखान शेख यांनी सामाजिक बांधिलकी जपत एका नवजात अर्भकाला जीवनदान मिळवून देण्यासाठी केलेल्या धडपडीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. पर्यावरणप्रेमी प्रवीणकुमार जगताप यांनी कडाक्याच्या उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी खाद्य व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून पक्षी संवर्धनासाठी केलेल्या कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली. तसेच सोसायटीमध्ये उत्कृष्ट कामकाज करणारे सचिव सुदेश शीलवंत यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आरएसएसचे पुणे विभाग संघचालक संभाजी गवारे यांनी पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. “आज अनेक ठिकाणी शेतजमीन नापिक होत चालली आहे. रासायनिक खतांचा अतिरेक, पाण्याची कमतरता आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे शेती संकटात सापडत आहे. त्यामुळे वृक्षलागवड, जलसंधारण आणि नैसर्गिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी गावातील नदी परिसर विकसित करून पर्यटनस्थळ निर्माण करण्याची संकल्पनाही मांडली. “आपल्या गावातील नदी आणि निसर्ग अतिशय सुंदर आहे. योग्य नियोजन आणि पर्यावरण संवर्धन केले तर येथे उत्कृष्ट पर्यटनस्थळ उभे राहू शकते. जर्मनीसारख्या देशांनी जंगल आणि निसर्ग जपत पर्यटन वाढवले आहे. तसेच आदर्श आपल्या गावातही निर्माण करता येतील,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक हिरामण गवारे, खरेदी विक्री संघाचे संचालक काळुआण्णा गवारे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे, श्री पांडुरंग विद्यामंदिरचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, माजी उपसरपंच दिलीप गवारे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जयेश शिंदे, ग्रामसेवक डी. एन. कुंभार, कृषी सहाय्यक शैलाताई जाधव, सामाजिक कार्यकर्ते मधुकर दोरगे, पदवीधर शिक्षक विजय कुंभार, सोसायटीचे चेअरमन वैभव गवारे, व्हाईस चेअरमन ॲड. संतोष गवारे, माजी चेअरमन मनीषाताई गवारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संकेत गवारे, राजेंद्र वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे व्हाईस चेअरमन ॲड. संतोष गवारे यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे यांनी सूत्रसंचालन केले, तर सोसायटीचे अध्यक्ष वैभव गवारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
समाजविकास, पर्यावरण संवर्धन, आधुनिक शेती आणि सामाजिक बांधिलकी यांच्या संगमातून गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *