शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई तसेच दौंड तालुक्यातील नांदगाव या दोन गावांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून, पुलावरील सिमेंट निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडगाव रासाई आणि नांदगाव दरम्यान असलेला हा पूल दोन्ही तालुक्यांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग मानला जातो. दररोज या पुलावरून दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मात्र सध्या पुलावरील सिमेंटचा थर मोठ्या प्रमाणावर उखडला असून आतील लोखंडी जाळी आणि गज बाहेर दिसू लागले आहेत. अनेक ठिकाणी खोल खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
विशेषतः जड वाहने पुलावरून जात असताना पुलाला हादरे बसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात भीमा नदीला पूर आल्यानंतर अनेक वेळा पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे पुलाची आणखी हानी होऊन मोठी दुर्घटना घडण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीही पुलाच्या दुरुस्तीबाबत मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी वडगाव रासाई व नांदगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
“मोठा अपघात घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.




