अल्लाउद्दीन अलवी पुणे जिल्हा प्रतिनिधी ता.२८ : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, वडगाव रासाई, इनामगाव, निर्वी परिसरातील सर्व मस्जिदींमध्ये ईद उल अजहा अर्थात बकरी ईद मोठ्या धार्मिक उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांनी नवीन वस्त्रे परिधान करून मस्जिदींमध्ये हजेरी लावत अल्लाहची प्रार्थना केली. नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली.

यावेळी पंचक्रोशीमधील बाभुळसर बुद्रुक, सादलगाव, पिंपळसुटी, शिरसगाव काटा, तांदळी, कोळगाव डोळस आदी गावांतील बहुसंख्य मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाज पठणासाठी सहभागी झाले होते. ईद उल अजहा हा त्याग, मानवता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा सण असून सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मांडवगण फराटा येथील औट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुस्लिम जमातीतर्फे पोलीस प्रशासनाच्या सहकार्याबद्दल उपनिरीक्षक रमेश कदम साहेब व त्यांच्या स्टाफचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये जेष्ठ इसाक चाचा शेख, सिंकदर आतार, शहानुर सय्यद गुरुजी, कासम सय्यद, जावेद आतार, तन्वीर तांबोळी, पापाभाई आतार, लाला शेख, चांद सय्यद, पत्रकार अल्लाउद्दीन अलवी, जाकीर सय्यद, युनुस सय्यद, शफीभाई शेख, हबीब सय्यद, बिलाल तांबोळी आदी बहुसंख्येने मुस्लिम जमात उपस्थित होती.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना शहानुर सय्यद गुरुजी यांनी सांगितले की, मांडवगण फराटा येथील मुस्लिम समाज हा सर्व घटकांतील समाजामध्ये मिळून मिसळून वावरताना दिसतो. गावातील सामाजिक ऐक्य, परस्पर प्रेम आणि बंधुभावामुळे सर्व समाजातून ईदच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे त्यांनी सांगितले. धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श संदेश देणारा हा ईद उत्सव परिसरात चर्चेचा विषय ठरला.




