भुईमुगाच्या शेतात जनावरे गेल्याच्या कारणावरून शेतकऱ्यास लोखंडी रॉडने मारहाण; ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

विजय कांबळे | प्रतिनिधी 
शिरूर : तालुक्यातील कवठे यमाई येथे भुईमुगाच्या शेतात जनावरे गेल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर मारहाणीत झाले असून, ११ जणांनी एका शेतकऱ्यास लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० मे २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मौजे कवठे यमाई येथील फुलाई हॉटेलच्या बाजूला असलेल्या भुईमुगाच्या शेतात घडली. शेतात जनावरे गेल्याच्या कारणावरून आरोपींनी राग मनात धरून संजय शिवराम पोकळे (वय ५५, व्यवसाय शेती, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांना लोखंडी रॉड तसेच हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी अभिषेक बाळू कांदळकर, दत्ता किसन पोकळे, प्रदीप किसन पोकळे, शिवम कांदळकर (पूर्ण नाव माहित नाही), किसन बाजीराव कोकडे तसेच अभिषेक कांदळकर यांचे चार ते पाच अनोळखी मित्र अशा एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संजय पोकळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी बेकायदा जमाव जमवून त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली व जीवे मारण्याची धमकी दिली. सदर मारहाणीत त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखालील नडगीला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे.
फिर्यादीचा जबाब पूर्ण झाल्यानंतर त्यांचे भाऊ सुनील शिवराम पोकळे यांनी तो वाचून दाखवला असून, त्यानंतर तक्रार नोंदविण्यात आली. सहफौजदार चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असून, संदेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वारे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *