प्रतिनिधी – विकास साळुंके
दौंड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
दि. १९ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नंदा सूर्यकांत शितोळे (वय ५५, रा. शितोळेवस्ती, खडकी, ता. दौंड, जि. पुणे) या त्यांच्या शेतात काँग्रेस गवत काढण्यासाठी जात असताना एका अनोळखी आरोपीने त्यांच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रुपये किमतीचे ३३ मणी व दोन वाट्या असलेले मंगळसूत्र हिसकावून नेले. यावेळी फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता आरोपीने त्यांना उचलून जमिनीवर आपटत कमरेमध्ये लाथ मारून घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी तपास पथकाला योग्य सूचना देत गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच लोकेशनच्या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित इसम राहुल मयूर आंधळे (वय २७, रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेले १ लाख २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पोलिसांकडे सुपूर्द केले.
आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, किरण पांढरे, धनाजी गाडवे, अमिर शेख, निखिल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संजय कोठळे, पवन माने, गौरव हजारे व सोमनाथ चोंडे यांनी पार पाडली.




