वाखारीतील धनश्री लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक देहव्यापार प्रकरणी दोघांवर गुन्हा, 10 महिलांची सुटका
पाटस प्रतिनिधी – योगेश राऊत
दौंड तालुक्यातील वाखारी गाव हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या धनश्री लॉजवर यवत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अनैतिक देहव्यापाराचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी 10 पीडित महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई 18 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी महेंद्र संभाजी चांदणे (पोलीस हवालदार, यवत पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप बाबू पुजारी (वय 27, मूळ रा. जटकल, ता. बैदुर, जि. उडपी, सध्या रा. वाकडापूल, वाखारी, ता. दौंड) व शहबाझ सिराहा सय्यद (रा. वरंवड, ता. दौंड) यांच्याविरोधात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत कलम 4, 5 व 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अनैतिक शारीरिक व्यापार करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक, पंच तसेच बनावट ग्राहक यांच्या मदतीने धनश्री लॉजवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपी महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
छाप्यात पोलिसांनी एक हजार रुपयांची रोख रक्कम, ग्राहक नोंदणीचे रजिस्टर जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1 हजार 200 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा गोसावी करीत असून, पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.




