शिरूर तालुक्यात गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Rjnews 27मराठी  – रमेश बनसोडे 

शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे परिसरात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई करत तब्बल १२ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सुमारे २४ हजार लिटर कच्चे रसायन, तयार गावठी दारू तसेच हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव दुडे गावच्या हद्दीत दुडेवाडी परिसरातील घोडनदीच्या पश्चिम किनारी झाडाझुडपांमध्ये दत्ता दुडे यांच्या शेतालगत ही अवैध हातभट्टी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
या वेळी आरोपी आकाश रवि पवार (रा. लोणीकाळभोर, ता. हवेली) व त्याचा साथीदार धोंडीभाऊ गावडे (रा. शिनगरवाडी, टाकळी हाजी, ता. शिरूर) हे मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरून लोखंडी टाक्यांमध्ये साठवलेले अंदाजे २४ हजार लिटर कच्चे रसायन, ७० लिटर तयार गावठी दारू, हातभट्टी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व इतर उपकरणे जप्त केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली गावठी दारू मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *