नागरगाव (प्रतिनिधी – विजय कांबळे):
करडे गावचे मा. उपसरपंच राजेंद्र गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कडूस (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजेंद्र गायकवाड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात सातत्याने कार्य केले आहे. दीन-दलित, गोरगरीब नागरिकांना मदत करणे, गावातील विकासकामांना चालना देणे, तसेच समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले आहे. उपसरपंच म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी करडे गावाच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला.
पुरस्कार स्वीकारताना गायकवाड म्हणाले, “हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण करडे गावचा आहे. मी केलेल्या सामाजिक कार्याची ही पोचपावती असून, यामुळे मला समाजासाठी आणखी जोमाने काम करण्याचे बळ मिळेल.”
त्यांच्या या सन्मानामुळे करडे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिरूर तालुक्यासह पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याबद्दल विविध स्तरांतून कौतुक व्यक्त केले जात असून, भविष्यातही ते समाजासाठी प्रेरणादायी कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




