प्रतिनिधी : शाम जगताप
रेठरे कारखाना परिसरात सामाजिक बांधिलकी जपत व्यसनमुक्त समाजाच्या उभारणीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. आदिनारीशक्ती फाउंडेशनच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या *‘श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्र’*च्या उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम उत्साहात व मोठ्या दिमाखात पार पडला.
या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील व्यसनाधीन व्यक्तींना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन व पुनर्वसनाची संधी उपलब्ध होणार आहे. वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येला आळा घालण्यासाठी अशा केंद्रांची नितांत गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

उद्घाटन सोहळा माननीय सरपंच सौ. वैशाली साळुंखे (किल्ले मच्छिंद्रगड), पंचायत समिती सदस्या ईश्वरपूर सौ. स्वाती संभाजी मदने यांच्या हस्ते पार पडला. यावेळी टायगर ग्रुप वाळवा तालुका अध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा तसेच सांगली जिल्हा उपाध्यक्ष, झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य वाळवा तालुका सचिव शरद निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व्यसनमुक्ती ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. समाजातील तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकू नये, यासाठी कुटुंब, समाज आणि प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रामस्थांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत करत, अशा केंद्रांमुळे अनेकांचे जीवन नव्याने घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
आदिनारीशक्ती फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे रेठरे कारखाना व परिसरात व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होणार असून, समाजाला नवी दिशा देण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून होणार आहे.




