यवत पोलिसांची कारवाई: दौंड तालुक्यात तरुणाकडून अंमली पदार्थ जप्त; एकाला अटक

 

प्रतिनिधी – विकास साळुंके 

दौंड तालुक्यातील पाटस परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधात यवत पोलिसांनी मोठी कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत त्याच्याकडून मोठ्या किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास पाटस ते कुसगाव जाणाऱ्या रस्त्यावर वाघजे खंडकासमोर संशयित हालचाली आढळल्याने पोलिसांनी सापळा रचला. या वेळी एका तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे अंमली पदार्थ आढळून आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदित्य अंकुश माने (वय २४, रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) असे आहे. त्याच्याकडून सुमारे १.८९ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ३७,८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस तपासात आरोपी हा सदर अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई यवत पोलिस ठाण्याचे अधिकारी व पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तसेच, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचा देखील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या घटनेमुळे पाटस परिसरात अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांनी अशा कारवाया अधिक तीव्र करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *