गणेगाव दुमाला (ता. शिरूर, जि. पुणे) — येथील श्री भैरवनाथ यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या दोन दिवसीय यात्रेमध्ये धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष आकर्षण ठरली ती युवा महाराष्ट्र केसरी पैलवान अर्थव चव्हाण आणि पैलवान विशाल गव्हाणे यांच्यातील थरारक कुस्ती लढत.

अल्लाउद्दीन अलवी (पुणे जिल्हा प्रतिनिधी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, चैत्र महिन्यातील या यात्रेला परिसरातील भाविकांनी मोठी उपस्थिती लावली. रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४ ते ६ या वेळेत श्रींचा महाअभिषेक व ध्वजारोहण पार पडले. दुपारी ३ ते ७ दरम्यान दंडवत व शेरणी कार्यक्रम झाला. सायंकाळी ७ ते १० वाजता छबिना व श्री नाथसाहेबांची पालखी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मोठ्या उत्साहात काढण्यात आली. रात्री ११ वाजता “पाहुणं फक्त तुमच्यासाठी” या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाने उपस्थितांची मनं जिंकली.
सोमवार दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान हजेरी कार्यक्रम तसेच पुन्हा एकदा “पाहुणं फक्त तुमच्यासाठी” या ऑर्केस्ट्राद्वारे मनोरंजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कुस्ती आखाड्यात महाराष्ट्रातील नामांकित युवा पैलवान अर्थव चव्हाण (युवा महाराष्ट्र केसरी) आणि पैलवान विशाल गव्हाणे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत रंगली. या लढतीने उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला.
या प्रसंगी गणेगाव दुमालाचे सरपंच हभप तुकाराम महाराज निंबाळकर यांच्या हस्ते विजेत्यांचा शाल, श्रीफळ व रोख रक्कम ११,१११ रुपये देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कुस्ती क्षेत्रातील विश्वविख्यात विजेते प्रीतम दाभाडे यांचाही गावाच्या वतीने शाल, श्रीफळ व ७,१०० रुपयांच्या रोख रकमेने सन्मान करण्यात आला.
यात्रा कमिटीच्या वतीने आखाडा पंच म्हणून माजी सरपंच बन्सी जगताप, माजी सरपंच विजय कोंडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक जगताप, मारुती कुदळे, नारायण गरुड, गोविंद शिंदे आणि नाना निंबाळकर यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमास सरपंच हभप तुकाराम महाराज निंबाळकर, पोलीस पाटील सागर जगताप, उद्योजक राजेंद्र कोंडे, नवनाथ दाभाडे, प्रमोद गरुड, सुभाष पाटील निंबाळकर, ऋषीकेश निंबाळकर, सोमनाथ गरुड, नामदेव निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर, अमोल भोसले, दत्तात्रय निंबाळकर, राजेंद्र साळवे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ व पाहुण्यांचे आभार माजी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक जगताप यांनी मानले.





