विद्यार्थिनींमध्ये आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती – कवठे येमाई येथे आरोग्य व पोषण आहार मेळा उत्साहात

विद्यार्थिनींमध्ये आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती – कवठे येमाई येथे आरोग्य व पोषण आहार मेळा उत्साहात
विजय कांबळे – प्रतिनिधी


नागरगाव : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे विद्यार्थिनींमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, संतुलित आहार आणि आपत्कालीन आरोग्यसेवेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोग्य व पोषण आहार मेळ्याचे आयोजन करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल, कवठे येमाई आणि कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शिवराम मुंजावडे सर, विज्ञान शिक्षक शरद बोंबे सर, दाभाडे सर तसेच कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक भाऊसाहेब पंदरकर, प्रकल्प अधिकारी विनोद गोरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अश्विनी संकपाळ, सामाजिक कार्यकर्त्या उज्वला इचके व अर्चना तांबे उपस्थित होते. याशिवाय पंचायत समिती सदस्या कांचनताई सांडभोर, CRP प्रमिलाताई गायकवाड, इतर महिला तसेच शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेळाव्यादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सीपीआर (CPR) विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सीपीआर कधी आणि कशा पद्धतीने द्यावा याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती देत त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही करून दाखवले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थी व पालकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत करण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
तसेच विद्यार्थिनींना संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयातील मुलींनी स्वतः तयार करून आणलेल्या विविध पौष्टिक पदार्थांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात सादर केलेल्या पाककृतींपैकी उत्कृष्ट पाच पाककृतींची निवड करून संबंधित विद्यार्थिनींना क्रमांक देऊन गौरविण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूल, कवठे येमाई येथे आयोजित या आरोग्य व पोषण आहार मेळाव्यात विद्यालयातील सुमारे ८० विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी सौ. सत्यश्री थोरात, सौ. कामिनी गवळी, श्रीमती धसाडे, सौ. उज्वला पवार आणि सौ. दर्शना राजगुरू या महिला शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी प्राचार्य शिवराम मुंजावडे सर यांनी मार्गदर्शन केले. पंचायत समिती सदस्या कांचनताई सांडभोर यांनी विद्यार्थिनींना आरोग्य व पोषणाचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. विज्ञान शिक्षक शरद बोंबे तसेच डॉ. आरतीताई उचाळे यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहार आणि आरोग्य याविषयी माहिती दिली. कलाशिक्षक करंजकर सर यांनी विद्यार्थिनींची व्यवस्था पाहिली, तर दाभाडे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्य, पोषण आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याबाबत महत्त्वाची जनजागृती निर्माण झाली असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *