लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय : आता प्रत्येक वर्षी करावी लागणार e-KYC प्रक्रिया

राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना हा एक मोठा कल्याणकारी उपक्रम ठरत आहे. जुलै 2024 पासून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 चा लाभ दिला जातो. आतापर्यंत लाभार्थी महिलांना एकूण 14 हप्ते मिळाले असून नुकताच ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात केव्हा जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच सरकारने महिलांसाठी एक नवा नियम लागू केला आहे.

अपात्र महिलांकडून लाभ घेतल्याचे उघड
शासनाच्या निदर्शनास आले आहे की अनेक अपात्र महिलांकडून या योजनेचा गैरफायदा घेतला जात आहे. त्यामुळे लाभाची शाश्वती आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने आता कठोर नियमावली तयार
केली आहे.
e-KYC सक्तीची, दोन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक
आज जारी झालेल्या शासन निर्णयानुसार लाभार्थी महिलांची पडताळणी व प्रमाणीकरण करण्यासाठी Aadhaar Authentication द्वारे e-KYC अनिवार्य करण्यात आली आहे.
जीआरमध्ये नमूद केल्यानुसार दोन महिन्यांच्या आत सर्व लाभार्थींनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
ठरावीक कालावधीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास महिलांचा हप्ता थांबवण्यात येईल.

दरवर्षी करावी लागणार KYC
योजनेतील पारदर्शकता कायम राहण्यासाठी दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या आत केवायसी करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. म्हणजेच आता लाडक्या बहिणींना दरवर्षी KYC प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
ऑनलाईन सुविधा उपलब्ध
लाभार्थींनी आपली e-KYC प्रक्रिया https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून पूर्ण करायची आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, महिलांना दरवर्षी KYC करावी लागणार असल्याने काहींना ही प्रक्रिया त्रासदायक ठरू शकते, अशीही चर्चा रंगू लागली आहे




