आंबळे येथे पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ; पहाटे घराजवळ कुत्र्यावर हल्ला करून ठार, सीसीटीव्हीत थरारक घटना कैद

आंबळे येथे पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ; पहाटे घराजवळ कुत्र्यावर हल्ला करून ठार

Rjnews27 मराठी – रमेश बनसोडे 

शिरूर तालुक्यातील आंबळे गावातील अनोसे वस्ती परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला असून, पहाटेच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे.

 

आज पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास वेताळनगर येथील दिपक शिवराम संकपाळ यांच्या घराजवळ बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, बिबट्याच्या या हल्ल्याचा संपूर्ण थरारक प्रकार घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

या घटनेमुळे आंबळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका महिन्यात याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे बिबट्याचा लोकवस्तीच्या परिसरात सातत्याने वावर असल्याचे स्पष्ट होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

 

विशेष म्हणजे, संबंधित बिबट्या आकाराने मोठा असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, रात्रीच्या वेळी त्याचा वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये अधिकच दहशतीचे वातावरण आहे. घरांच्या अगदी जवळ बिबट्याचा संचार होत असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे.

 

या घटनेची वनविभागाने तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पंचनामा करावा, तसेच बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात तातडीने पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, अशी मागणी आंबळे परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकवस्तीच्या अगदी जवळ बिबट्याचा वारंवार वावर होत असल्याने भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *