बाभुळसर बुद्रुक येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
राष्ट्रीय पोलिओमुक्त भारताच्या संकल्पनेला बळ; शून्य ते पाच वर्षांतील बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन
अल्लाउद्दीन अलवी | पुणे जिल्हा प्रतिनिधी
बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे | दि. २२ नोव्हेंबर २०२६
भारत पोलिओमुक्त ठेवण्याच्या राष्ट्रीय संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला बाभुळसर बुद्रुक येथे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी बाभुळसर बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र हनुमंत नागवडे यांच्या हस्ते बालकाला पोलिओ डोस पाजून लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
लहान बालकांचे आरोग्य सुरक्षित राखणे, पोलिओसारख्या गंभीर संसर्गजन्य आजारापासून त्यांचे संरक्षण करणे आणि देशातील प्रत्येक बालकाला लसीकरणाचा लाभ मिळवून देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्यविषयक जनजागृती पोहोचविण्याच्या दृष्टीने या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या उद्घाटनप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नवेश रामचंद्र गवळी, बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी संचालक लक्ष्मण शंकर नागवडे, संत तुकाराम संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन मारुती नागवडे, संगणक परिचालक अमित नागवडे, आरोग्य प्रवर्तिका हांडे मॅडम, आशा स्वयंसेविका रुकसाना अलवी व राधिका रणदिवे, सहाय्यक पल्स पोलिओ मदतनीस तथा पत्रकार अल्लाउद्दीन अलवी, शिपाई संतोष भंडलकर, ताई भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आरोग्य प्रवर्तिका हांडे मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शासनाच्या निर्देशानुसार शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओचे डोस देणे आवश्यक आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी जागरूक राहून आरोग्य विभागाच्या मोहिमेला सहकार्य करावे. ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य यंत्रणेला पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महेंद्र हनुमंत नागवडे यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांतील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरणाचा लाभ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही बालक या मोहिमेपासून वंचित राहू नये, तसेच पोलिओसारख्या संसर्गजन्य आजारापासून बालकांचे संरक्षण व्हावे, यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावातील लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पल्स पोलिओ लसीकरण ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओचा डोस देऊन राष्ट्रीय आरोग्य मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बाभुळसर बुद्रुक येथे आयोजित या लसीकरण मोहिमेमुळे बालआरोग्याबाबत जनजागृतीला चालना मिळाली असून, पोलिओमुक्त भारताच्या ध्येयासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरत आहे.
सह्याद्रीचा आवाज | जनतेचा विश्वास, बातमीचा आवाज
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560





