डॉ. पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीवर संजय नागवडे पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती

डॉ. पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीवर संजय नागवडे पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती

 

उपाध्यक्षपदी दत्तात्रय नागवडे यांची निवड; विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित समिती कटिबद्ध

 

अल्लाउद्दीन अलवी | पुणे जिल्हा प्रतिनिधी

 

बाभुळसर बुद्रुक | दि. २३ नोव्हेंबर

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत शैक्षणिक प्रगतीचा सातत्यपूर्ण आलेख उंचावणाऱ्या डॉ. पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षपदी संजय आत्माराम नागवडे पाटील, तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय वाल्मीक नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक बळ देण्यासाठी आणि भविष्यातील विकासकामांना गती देण्यासाठी नव्या समितीची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

 

बाभुळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला आणि मांडवगण फराटा या तीन गावांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले हे विद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरले आहे. सुसज्ज शालेय इमारत, अद्ययावत प्रयोगशाळा, उच्चशिक्षित शिक्षकवृंद आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी यांच्या माध्यमातून विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. स्थापनेपासून आजपर्यंत एसएससी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखणे ही विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची उल्लेखनीय बाब आहे.

 

परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटोळे, शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब नागवडे आणि माजी चेअरमन सुनील दादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाची वाटचाल सुरू आहे. मुख्याध्यापिका श्रीमती उषा गावडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

 

नवनिर्वाचित अध्यक्ष संजय आत्माराम नागवडे पाटील यांनी विद्यालयाच्या विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, विद्यालयाच्या स्थापनेपासूनच या संस्थेशी आपले योगदान आणि जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. यापुढील काळातही विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार असून, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

 

स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांसह मार्गदर्शक आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये मार्गदर्शक सदस्य म्हणून रमेश कल्याण पाटोळे, तर सदस्य म्हणून सुभाष पोपट निंबाळकर, मनोहर संभाजी मचाले, अमोल राजेंद्र नागवडे, गणेश फत्तेसिंग नागवडे, नानासाहेब कोंडीबा नागवडे, कविता हनुमंत पाटोळे, संगीता सुनील नागवडे, सारिका नितीन ढमढरे, मोहिनी महेंद्र रणदिवे आणि पत्रकार अल्लाउद्दीन हुसेन अलवी यांचा समावेश आहे. स्थानिक स्कूल कमिटीच्या सचिवपदी मुख्याध्यापिका श्रीमती उषा गावडे यांची निवड करण्यात आली.

 

नवीन समितीच्या सदस्यांना विद्यालयाच्या प्रस्तावित विकासकामांची माहिती देताना मुख्याध्यापिका उषा गावडे यांनी शाळेतील विद्यार्थी पटसंख्या आणि शिक्षकांनी सांभाळलेली जबाबदारी यांचे कौतुक केले. विद्यालयाच्या पुढील वाटचालीत समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

 

यावेळी शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब नागवडे यांनी विद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. आगामी शैक्षणिक वर्षात पालकांशी थेट संपर्क साधून विद्यार्थ्यांना या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अल्लाउद्दीन अलवी यांनी केले, तर शिक्षक काकडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थी विकासाला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा परिसरातील शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights