आमदार माऊली आबा कटके यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने; १६०० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी भेटवस्तू आणि सत्काराऐवजी समाजसेवेला प्राधान्य; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात, सौरऊर्जेलाही प्रोत्साहन
Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे
शिरूर-हवेली : वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, सत्कार आणि भेटवस्तूंचा ओघ पाहायला मिळतो. मात्र, शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी यंदाचा वाढदिवस काहीसा वेगळ्या पद्धतीने साजरा केला. भेटवस्तू आणि सत्कारापेक्षा आरोग्यसेवा, शेतकऱ्यांना मदत आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत वाढदिवस साजरा करण्यात आला.

दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत यंदाचा वाढदिवस समाजासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीची जाणीव ठेवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही पुढाकार घेण्यात आला.

एकाच दिवशी १६०० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी
हवेली तालुक्यातील वाघोली, पेरणे, वाडेबोल्हाई, उरुळी कांचन, लोणी काळभोर आणि कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांचा १६०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, कॅन्सर तपासणी, आयुष तपासणी, रक्त तपासणी, नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान, ईसीजी, माता-बालक आरोग्य तपासणी तसेच ओपीडी अशा विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तपासणीनंतर नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन आणि पुढील उपचाराबाबत सल्लाही देण्यात आला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात
राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीही पुढाकार घेण्यात आला आहे. मतदारसंघातील विविध प्रतिष्ठित व्यक्ती, पदाधिकारी आणि नेत्यांनी आपल्या परीने आर्थिक मदत जमा केली आहे.
ही मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदीपदादा कंद यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना मदत पोहोचविण्यात येणार आहे.
वीज समस्येवर सौरऊर्जेचा पर्याय
मतदारसंघातील नागरिकांना वीज समस्येतून दीर्घकालीन दिलासा मिळावा, यासाठी सौरऊर्जेच्या वापरालाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना सौरऊर्जा वापरण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी आमदार माऊली आबा कटके यांच्या वतीने विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
‘जनतेच्या सुख-दुःखात सोबत राहणे, हीच भूमिका’
वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांविषयी आमदार माऊली आबा कटके म्हणाले, “अजितदादा पवार दरवर्षी माझ्या वाढदिवशी आवर्जून शुभेच्छा देत असत. त्यांच्या आठवणींना अभिवादन करत यंदाचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेतला. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि १६०० हून अधिक नागरिकांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवा देणे, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट आहे. जनतेच्या सुख-दुःखात कायम सोबत राहणे, हीच माझी भूमिका आहे.”
वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे शुभेच्छा स्वीकारण्याऐवजी समाजासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोग्य, शेतकरी आणि ऊर्जा या तीन महत्त्वाच्या विषयांना स्पर्श करणाऱ्या उपक्रमांतून वाढदिवसाला सामाजिक कार्याची जोड देण्यात आली.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







