बाभुळसर बुद्रुकसह पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी; शेतकरीवर्गात समाधान

बाभुळसर बुद्रुकसह पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी; शेतकरीवर्गात समाधान

ऊस, कांदा, बाजरीसह विविध पिकांना दिलासा; पाकोळी रोगावर नियंत्रणाची शेतकऱ्यांना अपेक्षा

अल्लाउद्दीन अलवी Rjnews27 मराठी 

ता. २१ | बाभुळसर बुद्रुक

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील बाभुळसर बुद्रुक, मांडवगण फराटा, गणेगाव दुमाला, नागरगाव, वडगाव रासाई आणि सादलगाव परिसरात सोमवारी सुमारे एक तास सलग पावसाने हजेरी लावली. पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध पिकांना या पावसाचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या पावसामुळे ऊस, डाळिंब, टोमॅटो, दोडका, भोपळा, कपाशी आणि बाजरी या पिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच अडीच महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या गुलब्या कांदा पिकालाही सध्या पावसाची गरज होती. त्यामुळे झालेल्या पावसामुळे कांदा पिकासाठीही हा पाऊस उपयुक्त ठरण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, परिसरातील ऊस पिकावर पाकोळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत. या रोगामुळे ऊस शेंड्यापासून बुडाक्यापर्यंत वाळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कारखाने सुरू होण्यापूर्वीच ऊस गुऱ्हाळावर गाळप करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यातच खत कंपन्यांनी वाढवलेले दर आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळे शासनाने सर्व साखर कारखान्यांना सुधारित एफआरपीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर देण्यास भाग पाडावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

यंदाचा गळीत हंगाम कारखान्यांकडून ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता गळीत हंगामाकडे लागले आहे.

दरम्यान, झालेल्या पावसामुळे पाकोळी रोगाला काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. “असाच पाऊस पुढेही झाला तर ऊस पिकाच्या एकरी उत्पादनात किमान दहा टनांनी वाढ होण्याची शक्यता आहे,” असे प्रगतिशील शेतकरी सुनील तुकाराम नागवडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *