“डीजेचा आवाज वाढला तर थेट गुन्हा; पुणे जिल्हा पोलिसांचा कडक इशारा”

पुणे जिल्ह्यात डीजेविरोधात पोलिसांचा कडक इशारा; नियम मोडल्यास थेट गुन्हा

Rjnews27 मराठी – अंकुश घारे 

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणे जिल्हा पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे मालकांवर आणि संबंधित गणेश मंडळांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिला आहे.

 

शिक्रापूर येथे पत्रकारांशी बोलताना गिल यांनी सांगितले की, गणेशोत्सव काळात जिल्ह्यात वाजणाऱ्या प्रत्येक डीजेच्या आवाजाची मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना आवाज मोजणीची यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई केली जाईल.

 

याशिवाय गणेशोत्सवात वापरण्यात येणारे बेकायदेशीर लेझर आणि प्लाझमा उपकरणे जप्त करण्याची कारवाईही करण्यात येणार आहे. या निर्णयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे गिल यांनी स्पष्ट केले.

 

डीजेच्या मोठ्या आवाजाचा सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांना होत असल्याचे सांगत, अशा नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अधिक जबाबदारीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

दरम्यान, डीजेविरोधात तक्रार आल्यानंतरच कारवाई करण्याची पद्धत बदलण्यात येत असून पोलीस स्वतःहूनही नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करतील. तसेच नागरिकांनी त्रास होत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही गिल यांनी केले.

 

या वेळी शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दीपतरन गायकवाड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights