राहू (ता. दौंड) : प्रतिनिधी – विकास साळुंके
दौंड तालुक्यातील राहू गावातील मुख्य चौकात असलेल्या नीलकंठ ज्वेलर्स या सराफा दुकानावर रविवारी

(दि. १९) पहाटे अज्ञात चोरट्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला. मात्र, गावातील एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा डाव उधळला गेला आणि सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा मौल्यवान ऐवज सुरक्षित राहिला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी नीलकंठ ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानात घुसल्यानंतर त्यांनी तेथील सोन्या-चांदीचे दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू गोळा करून एका पिशवीत भरल्या. त्याचवेळी दुकानात बसविण्यात आलेली सुरक्षा यंत्रणा (सेन्सर अलार्म) सक्रिय झाली. अलार्मची सूचना थेट दुकानाचे मालक संकेत दहिवाळ यांच्या मोबाईलवर पोहोचताच त्यांनी तातडीने संबंधितांना घटनेची माहिती दिली.
याचदरम्यान गावातील प्रतीक सोनवणे हे मोटारसायकलवरून त्या परिसरात आले. मोटारसायकलचा आवाज आणि हेडलाईटचा प्रकाश पाहून चोरटे घाबरले. पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी भरलेली दागिन्यांची पिशवी दुकानातच टाकून पळ काढला. पळताना त्यांनी प्रतीक सोनवणे यांच्या दिशेने दगडफेक करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत ते घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आणि श्वानपथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले. या फुटेजमध्ये चार संशयित तरुण दिसून आल्याचे समोर आले असून, त्याआधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या धाडसी प्रसंगावधानामुळे लाखो रुपयांचा ऐवज चोरीला जाण्यापासून वाचल्याने प्रतीक सोनवणे यांचे गावासह परिसरात कौतुक होत आहे. दरम्यान, नीलकंठ ज्वेलर्सचे मालक संकेत दहिवाळ यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. या घटनेतील आरोपींना लवकरच अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असून, व्यापाऱ्यांमध्येही या घटनेनंतर सुरक्षेबाबत जागरूकता वाढली आहे.




