Copy of महिला रणरागिणींच्या उत्स्फूर्त सहभागाने गाजली पन्हाळा–पावनखिंड शौर्य मोहीम; स्वराज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प

प्रतिनिधी – विजय कांबळे

नागरगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा जपत आयोजित करण्यात आलेल्या पन्हाळा ते पावनखिंड ६५ किलोमीटरच्या शौर्य मोहिमेत यंदा महिला रणरागिणींचा उत्स्फूर्त सहभाग विशेष आकर्षण ठरला. शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई, तांदळी, मांडवगण, कात्रज तसेच धाराशिव परिसरातील दुर्गवेडे ग्रुपच्या शिवभक्तांनी दोन दिवसांत ही ऐतिहासिक मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करत स्वराज्याच्या इतिहासाला अभिवादन केले.

या मोहिमेत सहभागी झालेल्या महिलांनी कठीण डोंगरवाटा, पावसाळी वातावरण आणि शारीरिक आव्हानांचा धैर्याने सामना करत आपल्या जिद्दीची छाप पाडली. भविष्यात अधिकाधिक माता-भगिनींनी अशा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मोहिमांमध्ये सहभागी व्हावे, असा संदेश त्यांनी दिला.

मोहिमेत सुनील रावजी कळसकर, डॉ. सुजित शेलार, प्रशांतरावजी पवार, बबलू पाटील शेलार, काकासाहेब शेलार, सुहास शेलार, विजयराव शेलार, अमोल शेलार, विपुल शेलार, राज शेलार, अण्णा साळुंखे, सोनूदादा पवार, अमृतराव ढवळे, निलेश शेलार, शिवभक्त कुसेकर, किरण ढवळे, उमेश शेलार, अजिंक्य शेलार यांच्यासह शेलार व ढवळे परिवारातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

इतिहासातील पावनखिंडचा पराक्रम, बाजी प्रभू देशपांडे यांचे अद्वितीय बलिदान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी यांची आठवण करून देणारी ही मोहीम सहभागींसाठी प्रेरणादायी ठरली. स्वराज्याचा इतिहास प्रत्यक्ष पायवाटांवरून अनुभवत नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अशा उपक्रमांमुळे अधोरेखित होत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

या शौर्य मोहिमेच्या यशस्वी आयोजनाबद्दल दुर्गवेडे ग्रुपचे सर्वत्र अभिनंदन होत असून, भविष्यातही अशा ऐतिहासिक मोहिमा सातत्याने आयोजित करून स्वराज्याच्या प्रेरणेचा वारसा जपण्याचा निर्धार सहभागी शिवभक्तांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *