भीमा नदीच्या पुराचा तडाखा; मांडवगण फराटा परिसरातील शेतपिकांचे मोठे नुकसान – मनीषाताई कटके यांची पाहणी, तातडीच्या पंचनाम्यांचे निर्देश

मांडवगण फराटा : पुणे, देहू-आळंदी तसेच भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचा फटका भीमा नदीला बसला असून, मांडवगण फराटा परिसरात नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पुराच्या पाण्याने नदीकाठच्या शेतजमिनी जलमय झाल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार माऊली (आबा) कटके यांच्या पत्नी मनीषाताई कटके यांनी मांडवगण फराटा व परिसरातील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यापूर्वीच संभाव्य पूरस्थितीचा अंदाज लक्षात घेऊन आमदार माऊली कटके यांनी भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, सततच्या पावसामुळे भीमा नदीने धोक्याची पातळी गाठल्याने अनेक शेतांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे ऊस, टोमॅटो, दोडका, काकडी, फ्लॉवर यांसह विविध भाजीपाला पिके पाण्याखाली गेली. तसेच शेतकऱ्यांचे विद्युत मोटार पंप, सिंचन व्यवस्था आणि इतर शेती साहित्याचेही मोठे नुकसान झाल्याचे पाहणीत समोर आले.

पूरग्रस्त भागाची पाहणी करताना मनीषाताई कटके यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी तत्काळ दूरध्वनीद्वारे आमदार माऊली कटके यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर आमदार कटके यांनी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शासनाकडे नुकसान अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मनीषाताई कटके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी त्यांनी नदीकाठच्या नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले. खडकवासला धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदीपात्र, ओढे व पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या पाहणी दौऱ्यात राजू पाटील फराटे, सुधीर शेठ फराटे, हनुमंत आण्णा फराटे, मनोहर फराटे, योगेश फराटे, संदीप जगदाळे, शहाजी कोळपे, अक्षय फराटे, प्रतीक फराटे, अशोक नाना फराटे, पांडुरंग मोरे, अमोल शितोळे, अमोल नागवडे, पत्रकार राजेंद्र बहिरट, अल्लाउद्दीन अलवी यांच्यासह अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.

पूरामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत असून, शासनाकडून तातडीची मदत, पंचनामे आणि नुकसानभरपाईची मागणी परिसरातून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *