दौंड, प्रतिनिधी : विकास साळुंके
खुटबाव (ता. दौंड) येथे २०२० मध्ये घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाचा निकाल तब्बल सहा वर्षांनंतर लागला असून बारामती येथील अपर व जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये सखोल तपास आणि भक्कम पुरावे किती महत्त्वाचे असतात, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
३१ जुलै २०२० रोजी खुटबाव गावाच्या हद्दीत आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार उर्फ मंगेश अरुण जाधव याने कौटुंबिक वादातून त्याची पत्नी मनिषा उर्फ हनिबाई उर्फ आशीबाई मंगेश जाधव तसेच दीपक वाघमारे यांच्यावर लोखंडी कोयता आणि लाकडी काठीने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक बी. एन. पाटील यांनी या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करत आरोपीविरुद्ध ठोस व सबळ पुरावे गोळा केले. साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे आणि तपासातील विविध बाबींच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्याची अंतिम सुनावणी २ जुलै २०२६ रोजी बारामती येथील अपर व जिल्हा सत्र न्यायालयात झाली. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि प्रभावी युक्तिवाद यांचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.
या खटल्यात सरकारी अभियोक्ता सुनील वसेकर यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडत यशस्वी युक्तिवाद केला. तसेच यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, केस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर माने, जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सोळसकर, न्यायालय पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरख कसपटे, सहाय्यक फौजदार ए. जे. कवडे, पोलीस हवालदार अतुल राउत, पोलीस कॉन्स्टेबल अनिल माने व इंद्रजीत वाळुंज, पोलीस हवालदार धनराज कुंभार तसेच न्यायालय अंमलदार पोलीस हवालदार वेणुनाद टी. ढोपरे यांनी खटल्याच्या प्रभावी पाठपुराव्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या निकालामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्यपूर्ण तपास, सक्षम पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेतील प्रभावी मांडणी यांच्या जोरावर न्याय मिळू शकतो, असा विश्वास अधिक दृढ झाला आहे. सहा वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर दुहेरी खून प्रकरणात न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावत गुन्हेगारांना कायद्यापासून सुटका नाही, असा ठाम संदेश दिला आहे.




