पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता थेट भारतीय बाजारपेठेत उमटू लागले असून, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावामुळे इंधन बाजार अस्थिर झाला असून, भारतातही त्याचे परिणाम स्पष्टपणे जाणवू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता सीएनजीच्या दरातही सलग दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो एक रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे दिल्लीतील सीएनजीचा दर आता 80.9 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. तर गाझियाबादमध्ये हा दर 88.70 रुपये प्रति किलोवर गेला आहे. याआधी 15 मे रोजीही सीएनजीच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
याच दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही मोठी वाढ नोंदवण्यात आली होती. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 97.77 रुपये प्रति लिटरवर पोहोचला असून डिझेलचा दर 90.67 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, सीएनजी दरवाढ सध्या दिल्लीपुरती मर्यादित असली तरी आगामी काळात इतर शहरांमध्येही दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होणार असून प्रवासी भाडेवाढीची शक्यता निर्माण झाली आहे.
ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास जागतिक तेलपुरवठा साखळी आणखी विस्कळीत होऊ शकते. त्याचा परिणाम भारतासारख्या आयात-आधारित देशांवर मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो. त्यामुळे इंधन दरवाढ ही केवळ वाहनधारकांची समस्या राहणार नसून, ती संपूर्ण अर्थव्यवस्थेला प्रभावित करणारी ठरू शकते.
दरम्यान, वाढत्या इंधन किमतींमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, “महागाईच्या नव्या संकटाची ही सुरुवात तर नाही ना?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




