प्रतिनिधी | शिरूर – Rjnews27marath
पुण्यातील चऱ्होली येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे थेट शिरूर तालुक्यापर्यंत पोहोचल्याने शुक्रवारी रांजणगाव गणपती परिसरात अक्षरशः थरारक घडामोडी घडल्या. फरार आरोपींचा माग काढत आलेल्या पोलिसांनी अष्टविनायक रोड परिसरात सापळा रचताच आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला आणि काही काळ पोलिस व आरोपींमध्ये हायव्होल्टेज पाठलाग रंगला. या घटनेमुळे पिंपरी दुमाला, वाघाळे, सोनेसांगवी परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
माहितीनुसार, चऱ्होली येथे १३ मे रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात शेखर संभाजी जाधव (रा. शिक्रापूर) याच्यासह त्याच्या साथीदारांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. किरकोळ वादातून सुरू झालेला हा संघर्ष पुढे जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. करण गुरुनाथ राठोड यांनी शेखर जाधव याला चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याने दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. त्याच रागातून आरोपींनी मारहाण करत गोळीबार केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
दरम्यान, फरार आरोपी रांजणगाव गणपती परिसरातील शेळके वस्ती भागात लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण, रांजणगाव एमआयडीसी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकांनी परिसरात जाळे पसरवले. मात्र पोलिसांची हालचाल लक्षात येताच आरोपींनी दुचाकीवरून वेगाने पलायन सुरू केले.
अष्टविनायक रोडवरील गणपती चौक परिसरात काही काळ पोलिसांच्या गाड्या आणि आरोपींची दुचाकी यांच्यात पाठलाग सुरू होता. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अचानक आरोपींची दुचाकी बंद पडल्याने त्यांनी वाहन रस्त्यातच सोडून दिले आणि जवळील उसाच्या शेतांचा आधार घेत अंधारात पसार होण्याचा प्रयत्न केला.
या वेळी हवेत गोळीबार झाल्याची चर्चा परिसरात पसरली. काही नागरिकांनी आरोपींकडून पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्याचा दावा केला, तर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल हवेत फायर केल्याची चर्चा रंगली. मात्र या संदर्भात अधिकृत माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी करण्यात आली होती. उसाची शेते, ओढ्यालगतचा भाग, वस्ती परिसर आणि अंतर्गत रस्त्यांवर पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. अनेक गावांमध्ये पोलिसांच्या वाहनांच्या सायरनचा आवाज आणि सुरू असलेली धावपळ यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, मुख्य आरोपी शेखर जाधव याच्यावर यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू असून पोलिसांकडून अधिकृत खुलाशाची प्रतीक्षा आहे. चऱ्होलीतील गोळीबार प्रकरणानंतर थेट शिरूर तालुक्यात सुरू झालेल्या या पोलिसी कारवाईमुळे ग्रामीण भागातही गुन्हेगारीचे सावट वाढत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.




