शिरूर (प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी, दि. २६):
शिरूर तालुक्यातील घोड धरणाच्या उजव्या कालव्यातून हेड टू टेल पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे, अशी ठाम मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केली असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
घोड उजवा कालवा विभागांतर्गत पाटबंधारे विभाग, शिरूर येथील कनिष्ठ अभियंत्यांना याबाबत लाभधारकांनी लेखी निवेदन सादर केले आहे. उन्हाळी रोटेशननुसार दि. २३ एप्रिल २०२६ रोजी कालव्यातून पाणी सोडण्यात आले असले, तरी दि. २६ एप्रिलपर्यंतही पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचलेले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
कालव्याच्या १४ व्या मैलावर पाण्याची पातळी तपासली असता ती २.४० च्या पुढे जात नसल्याचे आढळून आले. परिणामी शेवटच्या टोकापर्यंत (टेल एंड) पाणी पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वडगाव रासाई येथील पाणी वापर संस्थेने तब्बल दोन लाख रुपयांचा भरणा करूनही नियोजित प्रमाणात पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यापूर्वीच्या दोन रोटेशनमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पाणी सोडून तीन दिवस उलटूनही अपेक्षित पातळी गाठली नसल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. यामुळे पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना पाणी वापर लाभधारक योगेश शेलार म्हणाले, “शेतकऱ्यांनी वेळेवर पाणीपट्टी भरूनही योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास यापूर्वीपेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
दरम्यान, कालव्याच्या व्यवस्थापनात पारदर्शकता राखून हेड ते टेल समान पाणीपुरवठा करावा, तसेच पाण्याचे नियोजन काटेकोरपणे अंमलात आणावे, अशी मागणी लाभधारक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.




