टाकळी भिमा (ता. शिरूर, जि. पुणे) |
प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी
टाकळी भिमा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते, शिवव्याख्याते आणि पत्रकार हभप योगेश महाराज करपे यांची द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिरूर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पत्रकारितेला नवे नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
योगेश करपे हे सध्या शिरूर तालुका वारकरी सेवा संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून, त्यांनी सामाजिक, धार्मिक आणि पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध प्रश्नांना नेहमीच वाचा फोडली आहे. त्यांच्या उत्कृष्ट जनसंपर्क कौशल्य, काम करण्याची तळमळ आणि समाजाभिमुख दृष्टीकोन याची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
ही नियुक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अन्सार शेख यांच्या सूचनेनुसार, राज्याध्यक्ष शकील मनियार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुणे जिल्हाध्यक्ष काशिनाथ आल्हाट आणि उपाध्यक्ष अल्लाउद्दीन अलवी यांच्या उपस्थितीत लवकरच योगेश करपे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष काशिनाथ आल्हाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना योगेश महाराज करपे यांनी सांगितले की, “पुणे जिल्ह्यात ‘द युवा ग्रामीण पत्रकार संघ’ अधिक सक्षम आणि व्यापक करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या समस्यांना न्याय मिळवून देणे आणि पत्रकारितेचा दर्जा उंचावणे, हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल.”
त्यांच्या या निवडीबद्दल विविध सामाजिक, धार्मिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळाबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे.




