मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा पिंपरी दुमाला येथे उत्साहात शुभारंभ

मुख्यमंत्री समृद्ध  पंचायतराज   अभियानाचा  पिंपरी दुमाला येथे उत्साहात शुभारंभ

पिंपरी दुमाला (ता.शिरूर, जि – पुणे.) : महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान दिनांक १७ सप्टेंबर रोजी पिंपरी दुमाला येथे मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले. या अभियानाची अंमलबजावणी राज्यभरात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, योजनांचा अंमलदार, संस्था सक्षमीकरण, उत्कर्षासाठी विकास व सामाजिक बदल तसेच नवोन्मेष व आधुनिक तंत्रज्ञान या सात घटकांच्या आधारे प्रत्येक गावाचे मूल्यांकन होणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

शुभारंभ कार्यक्रमानिमित्त पिंपरी दुमाला जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीचे आयोजन केले होते. “समृद्ध पंचायत, सक्षम गाव”,जलसंधारण आपली जबाबदारी”, “स्वच्छता हीच सेवा” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावभर जनजागृती केली.

कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, केंद्रप्रमुख, महसूल कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी व शालेय कर्मचारी, महिला बचत गट व मंडळाचे कार्यकर्ते, देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी, विविध तरुण मंडळे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या अभियानामुळे गावकुसातील विकास प्रक्रियेला नवी गती मिळून, सामाजिक ऐक्य व प्रशासनातील पारदर्शकता यांना चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *