जीएसटी कपात : वाहनांच्या किंमती घसरल्या, बँकांमध्ये कर्ज रद्द करण्याची गर्द

जीएसटीमध्ये झालेल्या मोठ्या कपातीचा थेट परिणाम आता वाहनांच्या बाजारावर दिसून येत आहे. दुचाकी, चारचाकी तसेच एसयुव्हींच्या किंमती कमी होणार असल्याची घोषणा कंपन्यांनी केली असून त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.

मोठ्या एसयुव्हींवर ५ ते ७ टक्के आणि छोट्या कारवर तब्बल १० ते ११ टक्क्यांपर्यंत कर कमी होणार आहे. या कपातीचा लाभ २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. परिणामी, १२०० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या कारच्या किंमती ६० हजार ते १.५५ लाखांपर्यंत कमी होणार आहेत.

बँकांकडे ग्राहकांचा वाढता ओढा
नवरात्री आणि दसऱ्यासाठी गाड्यांची बुकिंग करून ठेवलेले ग्राहक आता बँकांकडे धाव घेत आहेत. कारण जीएसटी कपातीमुळे गाडीची किंमत कमी झाल्याने, त्यांना आवश्यक असलेले कर्ज रक्कमही कमी होणार आहे.

कर्ज आधीच मंजूर झालेल्या ग्राहकांना, “दर कमी झाले आणि कर्ज जास्त मंजूर झाले” अशी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे हे ग्राहक मंजूर झालेले कर्ज रद्द करून नवे कर्ज घेण्याचा पर्याय निवडत आहेत.

जीएसटी परिषदेचा निर्णय
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जीएसटी परिषदेत १२ आणि २८ टक्के स्लॅब काढून टाकण्यात आले. या निर्णयानंतर ज्या वस्तू या करांत येत होत्या त्यांना आता ५ किंवा १२ टक्क्यांच्या कर स्लॅबमध्ये आणण्यात आले. तर प्रीमियम वस्तूंवर ४० टक्के कर लागू करण्यात आला आहे. वाहनांचा समावेश यामध्ये होत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बँकांचा अनुभव
“कर्ज रद्द करण्याचे शुल्क खूपच कमी आहे. मात्र, २२ सप्टेंबरनंतर मिळणारा फायदा या शुल्कापेक्षा खूपच मोठा असल्याने अनेक ग्राहक जुने कर्ज सोडून नवे कर्ज घेण्याचा पर्याय निवडत आहेत”, अशी माहिती एका बँक मॅनेजरने दिली.
यामुळे येत्या सणासुदीच्या काळात वाहन विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




