दुबईतून सायबर गुन्ह्यांचे जाळे; १० ते १२ हजार सिमकार्डचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश!
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई; इंटरपोलच्या मदतीने मुख्य सूत्रधाराला मुंबई विमानतळावर अटक, चीन कनेक्शनही उघड
प्रतिनिधी – योगेश राऊत
पिंपरी : दुबईत बसून भारतासह विविध ठिकाणी सायबर फसवणुकीचे जाळे चालविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीला सायबर गुन्ह्यांसाठी तब्बल १० ते १२ हजार मोबाईल सिमकार्ड पुरविण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार सुमंत उर्फ नानू रवींद्र दसरे याला इंटरपोलच्या मदतीने मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्याचे चीनमधील एका नागरिकाशीही संबंध असल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा झाला. सुरुवातीला तुषार अमराराम चौधरी आणि आदर्श संतोष वाघमारे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत दुबईत राहून रॅकेट चालविणारा सुमंत दसरे हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरोधात लूकआउट सर्क्युलर जारी करून इंटरपोलच्या मदतीने त्याला भारतात आणण्यात आले.
तपासात मनीष अशोकलाल वाधवा आणि महेश कन्हैयालाल चौइथरामानी यांनी मुख्य आरोपीला १० ते १२ हजार सिमकार्ड पुरविल्याचे उघड झाले. या दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली. त्यांच्या पासपोर्ट तपासणीत ते २५ ते ३० वेळा दुबईला जाऊन आल्याची माहिती समोर आली.
याशिवाय सूरज मुन्नालाल चिकवा आणि राजा अशोक कुमार हे मोबाईल कंपनीत विक्रीचे काम करत होते. नवीन सिमकार्ड घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना ओटीपी एक्सपायर किंवा सर्व्हर डाऊन असल्याची कारणे सांगून त्यांची दिशाभूल केली जात होती. ग्राहकांना सिमकार्ड न देता ते परस्पर सायबर गुन्हेगारांना पुरविले जात होते.
या सिमकार्डचा वापर फसवणुकीचे फोन करणे, बनावट मोबाईल ॲप तयार करणे, बँक खात्यांशी मोबाईल क्रमांक जोडणे आणि बनावट ई-मेल आयडी तयार करण्यासाठी केला जात होता. वारंवार सिमकार्ड बदलून आरोपी स्वतःची ओळख लपवत असल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
सात आरोपींना अटक
या प्रकरणात तुषार चौधरी, आदर्श वाघमारे, सुमंत दसरे, मनीष वाधवा, महेश चौइथरामानी, सूरज चिकवा आणि राजा कुमार या सात जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने पुरविलेल्या सिमकार्डचा वापर नेमका किती सायबर गुन्ह्यांमध्ये झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
हजारो सिमकार्डच्या माध्यमातून चालणारे हे सायबर गुन्हेगारीचे जाळे उघड झाल्याने मोबाईल सिमकार्ड विक्री प्रक्रियेतील सुरक्षेचा आणि ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560





