*शिरूर–चौफुला मार्गावरील केडगावच्या जुन्या टोलनाका चौकात गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी*
प्रतिनिधी – विकास साळुंके
वाढती वाहतूक आणि वाहनांचा वेग ठरतोय अपघाताला निमंत्रण; संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज
केडगाव : शिरूर–चौफुला मार्गावरील केडगाव हद्दीतील जुन्या टोलनाका चौकात गतिरोधक बसविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. या चौकातून दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत असून, दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र, या ठिकाणाहून अनेक वाहने वेगाने जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जुना टोलनाका चौक हा परिसरातील महत्त्वाचा आणि रहदारीचा चौक बनला आहे. या चौकातून रस्ता ओलांडताना पादचारी, दुचाकीस्वार तसेच स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांचा वेग नियंत्रित नसल्यामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन जुन्या टोलनाका चौकात तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560




