इंदापूर प्रतिनिधी :- अंकुश भोसले
पुणे, १७ नोव्हेंबर २०२६ — पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण भवनात दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘अजित पवार प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात आले.

या स्मृतिदिनाच्या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
अमित शहांचे स्मरण
कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी अजितदादांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राची, विशेषतः पुणे, बारामती आणि पिंपरी-चिंचवड परिसराची अपूरणीय हानी झाली असल्याचे म्हटले. त्यांनी दादांच्या निधनाने निर्माण झालेली जागा एकट्या व्यक्तीने भरून निघणार नाही, असेही विचार व्यक्त केले.
अजितदादा पंचायतराज, सहकार, शेती आणि आधुनिक शहरी विकास या क्षेत्रांतील विस्तृत दृष्टी असलेले लोकनेते होते, असे शाह यांनी सांगितले. दूध संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, साखर कारखाने, शहरी सहकारी बँका किंवा जिल्हा सहकारी बँका—सहकार क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी दादांचे ज्ञान विशेष महत्त्वाचे होते, असे त्यांनी नमूद केले.
कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेत अजितदादा सकाळी सातच्या सुमारास सचिवालयात उपस्थित राहत असत. ऑक्सिजन आणि इतर आवश्यक व्यवस्थांसाठी तातडीने निर्णय घेण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती, असे शाह यांनी आठवले.
‘युवा नेत्यांसाठी विद्यापीठ’
अजितदादांचे कार्य, शिस्त, नियोजन आणि कामाची गती भविष्यातील तरुण राजकीय कार्यकर्त्यांसाठी व नेत्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशी भावना अमित शाह यांनी व्यक्त केली. “दादांचा राजकीय प्रवास युवा नेत्यांसाठी एका विद्यापीठाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल,” असे त्यांनी म्हटले.
दादांचे राजकीय प्रवास बारामतीपासून सुरू झाले आणि ते महाराष्ट्राच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचले; तरीही ते जमिनीशी, लोकांशी आणि आपल्या मतदारसंघाशी जोडलेले राहिले, असेही शाह यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार भावूक
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रसंगी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक विचार व्यक्त केले. “पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी दादांनी आयुष्य वेचले; त्याच जिल्हा परिषदेत आज त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. ही भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे,” असे त्या म्हणाल्या.
दादांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी विशेष आदर होता. महाराष्ट्र, शेती, सहकार आणि विकासासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत असत, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
विकासाचा वारसा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजितदादांच्या राजकीय कारकीर्दीतील क्षणांना उजाळा देत त्यांच्या विकासकार्याचा गौरव केला. पुणे जिल्ह्याचा विकास, शेती, सहकार, ग्रामीण पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांतील त्यांचे योगदान यावेळी विशेषतः स्मरणात आणले गेले.
मुख्यमंत्र्यांनी ‘समृद्ध पंचायतराज’ अभियानात पुणे जिल्हा परिषदेला द्वितीय क्रमांक मिळाला असला, तरी दादांचे स्वप्न प्रथम क्रमांकाचे होते; ते पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला. दादांची अपूर्ण स्वप्ने, विचार आणि विकासाचा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
स्मृती अधिक जिवंत
या सोहळ्याच्या निमित्ताने अजितदादांच्या जीवनकार्यावर आधारित छायाचित्र दालनाचेही उद्घाटन झाले. त्यांच्या राजकीय प्रवासातील, जनसेवेतील आणि विकासकामांतील विविध क्षण या प्रदर्शनातून पुन्हा एकदा समोर आले.
तसेच त्यांच्या कार्याचा आणि आठवणींचा वेध घेणारे पुस्तक प्रकाशित करण्यात आले व लघुचित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेतला.
हा पुतळा आणि ‘अजित पवार प्रवेशद्वार’ केवळ स्मारक न राहता लोकसेवेची, कार्यक्षमतेची आणि विकासाची प्रेरणा ठरावा, अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त झाली.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560





