भट्टीतून तावून सुलाखून निघालेले नेतृत्व; जनतेचे प्रेम हीच कामाची ऊर्जा

 

पारनेर : प्रतिनिधी

संघर्ष, जिद्द, जनसंपर्क आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ या बळावर राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे खासदार नीलेश लंके हे आता भट्टीतून तावून सुलाखून निघालेले नेतृत्व आहे. अनेक संकटांचा आणि आव्हानांचा सामना करीत त्यांनी आपली राजकीय वाटचाल घडविली असून, आता त्यांनी आणखी मोठी झेप घेतली पाहिजे, अशा शब्दांत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. जनतेचे मिळणारे प्रेम आणि विश्वास हीच त्यांच्या अविरत कामाची खरी ऊर्जा असल्याचेही थोरात यांनी आवर्जून नमूद केले.

 

 

खासदार नीलेश लंके यांनी दिवाळीनिमित्त हंगा येथे आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास गुरुवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती लावली. या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी लंके यांच्या राजकीय संघर्षाचा, कार्यशैलीचा, जनसंपर्काचा आणि लोकांसाठी अहोरात्र सुरू असलेल्या धडपडीचा गौरव केला.

 

थोरात म्हणाले की, नीलेश लंके यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत वेगळे आणि अभूतपूर्व आहे. सहा विधानसभा मतदारसंघांचा व्याप सांभाळताना ते रात्रंदिवस जनतेच्या कामासाठी धावत असतात. आमच्या राजकीय कारकिर्दीतही आम्ही जनतेसाठी काम केले; मात्र लंके यांच्याप्रमाणे एवढी धावपळ केली नाही. ते ना थकतात, ना विश्रांती घेतात. कोणत्या एनर्जीची गोळी घेतात, हे त्यांनी सर्वांना सांगावे, अशी मिश्किल टिप्पणी करीत त्यांनी लंके यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले.

 

खासदार लंके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संघर्षातून उभे केलेले नेतृत्व, माणसे जोडण्याची त्यांची हातोटी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची वृत्ती निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामामागे कोणतीही कृत्रिम ऊर्जा नसून जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच त्यांची खरी ताकद आहे. निवडणुकीच्या काळात त्यांनी केलेल्या संघर्षाच्या अनेक कथा ऐकण्यासारख्या आहेत. या संघर्षमय प्रवासावर पुस्तक लिहिले, तर त्यातून भविष्यात अनेक नवे कार्यकर्ते आणि नेतृत्व घडू शकतील, असेही थोरात यांनी सांगितले.

 

स्नेहमेळाव्याच्या भव्य आयोजनाचेही थोरात यांनी विशेष कौतुक केले. पहाटे चार वाजेपर्यंत फराळासाठी येण्याचे दिलेले आमंत्रण हा त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाचा आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याचा परिचय असल्याचे त्यांनी सांगितले. या आयोजनात जागरण-गोंधळाचा कार्यक्रम ठेवायला काही हरकत नव्हती, अशी मिश्किल टिप्पणी करून त्यांनी उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटविली.

 

दरम्यान, राज्यात आगामी काळात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटाकडे लक्ष वेधताना थोरात यांनी सरकारने वेळीच जबाबदारी पार पाडण्याची गरज व्यक्त केली. पारनेर तालुक्यात आजच शंभर टँकर सुरू असल्याचा उल्लेख करीत आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. अशा संकटाच्या काळात सरकारने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. खासदार म्हणून नीलेश लंके यांच्यावरही जनतेप्रती मोठी जबाबदारी आहे. ते या कठीण परिस्थितीत जनतेला निश्चितच आधार देतील, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

 

लंके यांच्या कामाचे कौतुक करतानाच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा महत्त्वपूर्ण सल्लाही थोरात यांनी दिला. जनतेसाठी काम करण्याची धडपड निश्चितच महत्त्वाची आहे; मात्र त्यासाठी स्वतःचे आरोग्यही तितकेच जपले पाहिजे. वेळच्या वेळी जेवण, किमान पाच ते सहा तासांची झोप आणि नियमित आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतः निरोगी राहिल्यासच जनतेसाठी अधिक सक्षमपणे आणि दीर्घकाळ काम करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

या स्नेहमेळाव्यास खासदार नीलेश लंके यांच्यासह बाबासाहेब भोस, सीताराम काकडे, दीपक लंके, मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे, रवींद्र राजदेव, मारुती रेपाळे, अर्जुन भालेकर, मोहन रोकडे, रामेश्वर निमसे, ॲड. राहुल झावरे, कारभारी पोटघन, दादा शिंदे, सरपंच राजू शिंदे, संतोष खामकर, द. मा. ठुबे, दत्तात्रय वारे, अभयसिंह नांगरे, बापू चत्तर, ज्ञानदेव लंके यांच्यासह हजारो मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights