रांजणगाव सांडस येथे तरुणाला तिघांकडून बेदम मारहाण; लोखंडी रॉड व लाकडी स्टंपचा वापर, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी – बालाजी कांबळे
शिरूर : मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरून एका २९ वर्षीय तरुणाला तिघांनी मिळून मारहाण केल्याची घटना शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे घडली. या मारहाणीत लोखंडी रॉड आणि लाकडी स्टंपचा वापर करण्यात आल्याने तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सूर्यभान धनवट (वय २९, रा. खांडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हे १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रांजणगाव सांडस येथील जिल्हा परिषद शाळेजवळ आपला मुलगा कार्तिक याच्यासोबत बोलत होते. यावेळी मुलासोबत बोलण्यास मज्जाव करत आरोपींनी त्यांच्याशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या वादातून रविंद्र राणू मोरे याने लोखंडी रॉडने राहुल धनवट यांच्या दोन्ही हातांच्या दंडावर मारहाण केली. तर विजय राणू मोरे याने हातातील लाकडी स्टंपने डोक्यावर, दोन्ही हातांच्या दंडावर तसेच छातीवर मारहाण करून दुखापत केली. याशिवाय राणू मारुती मोरे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी रविंद्र राणू मोरे, विजय राणू मोरे आणि राणू मारुती मोरे (तिघेही रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे १३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४.०३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिंदे (ब.नं. २४९८) करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार टेंगले (ब.नं. २४९९) यांनी केली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीत घडलेल्या या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560





