जिल्हा बँकेत पहिल्याच दिवशी हातात नांगर घेऊन जाणार!
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य; बँकेतील कारभार चव्हाट्यावर आणणार – खासदार निलेश लंके
पारनेर : प्रतिनिधी
“जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कारखानदारांना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली जात असतील, तर शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योग उभारण्यासाठी मदत का मिळू नये? शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बँकेतील कारभाराचा जाब विचारणार असून, गरज पडल्यास अनियमितता चव्हाट्यावर आणणार,” असा आक्रमक इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला.
पारनेर तालुक्यातील पठार भागातील किन्ही-बहिरेबावाडी येथे मंगळवारी (दि. १०) विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल खासदार निलेश लंके यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
लंके म्हणाले, “जिल्हा बँकेत गेल्यानंतर माझ्या हातात नांगर असेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे ही माझी भूमिका आहे. कारखानदारांना कोट्यवधी रुपयांची कर्जे मिळत असतील, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही कर्ज मिळाले पाहिजे. मोठ्या लोकांच्या मुलांना उद्योग उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मुलांनीही उद्योजक व्हावे, यासाठी बँकेने मदत केली पाहिजे.”
जिल्हा बँकेतील कर्जवाटपावर भाष्य करताना लंके यांनी काही कारखानदारांना सुमारे २८५० कोटी रुपयांची बोगस कर्जे वाटप झाल्याचा आरोप केला. या सर्व बाबींचा जाब विचारण्याची भूमिका आपण घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. “धनदांडग्यांशी माझे नाते नाही; गोरगरीब जनतेशी माझे नाते आहे. शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल, तर मला बँकेत जाण्याचा अधिकार नाही,” असेही ते म्हणाले.
प्रत्येक निवडणूक मायक्रो प्लॅनिंगने लढवणार
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने मोठे सहकार्य केले. सर्व स्तरांतून मिळालेल्या पाठिंब्यामुळेच ही निवड शक्य झाली. आगामी काळात तालुक्यातील प्रत्येक निवडणूक मायक्रो प्लॅनिंग करून लढवली जाईल. सर्वसामान्यांच्या हितासाठी संघटितपणे काम करणार असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले.
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, “आम्ही सत्तेत कधी बसतो, याची मी वाट पाहत आहे. मात्र, समोरच्यांना हटवूनच सत्तेत बसणार, त्यांच्यात जाऊन बसणार नाही. राजकारणात दिवस कधी बदलतील हे सांगता येत नाही. सध्या झालेल्या निवडणुकांनंतर जनतेचा विचार बदलत असल्याचे दिसत आहे.”
सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न घेतल्याने शेतकरी वर्गात नाराजी असल्याचे सांगत, दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही लंके यांनी सांगितले.
किन्ही परिसरात कोट्यवधींच्या विकासकामांना चालना
कार्यक्रमात किन्ही विविध विकास सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीसाठी २० लाख रुपये, गोरेगाव-कानूर पठार रस्त्यासाठी १ कोटी २३ लाख रुपये, तर किन्ही-सोनांबी रस्त्यासाठी ४८ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून किन्ही परिसरात यापूर्वीही सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निलेश लंके यांचे गावात ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी लंके यांची लाडू तुला करून नागरी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर, ज्येष्ठ नेते मारुती रेपाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविंद्र राजदेव, दीपक लंके, माजी सभापती किसन रासकर, युवा नेते किरण ठुबे, विकास उर्फ बंडू रोहकले, जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किन्ही बहिरोबावाडी येथे निलेश लंके प्रतिष्ठान, किन्ही-बहिरोबावाडी, सद्गुरू ओंकार बाबा मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ, चंदूभाऊ मित्र मंडळ आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560




