बारामतीत औषधी इंजेक्शनच्या संशयित अवैध विक्रीचा पर्दाफाश; चार जण पोलिसांच्या ताब्यात
सह्याद्रीचा आवाज – योगेश राऊत
मार्केट यार्ड परिसरात पोलिसांचा छापा; इंजेक्शनचा साठा आणि दोन मोटारसायकली जप्त
बारामती : शहरातील औषधी इंजेक्शनच्या संशयित बेकायदेशीर विक्रीचा प्रकार उघडकीस आला असून, बारामती शहर पोलिसांनी इंदापूर रोडवरील मार्केट यार्ड परिसरात छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले आहे. MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP या औषधी इंजेक्शनचा अनधिकृत विक्रीसाठी साठा केल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी संबंधित इंजेक्शनचा साठा तसेच दोन मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत.
मार्केट यार्ड परिसरात औषधी इंजेक्शनचा अनधिकृत साठा आणि विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकत संशयितांना ताब्यात घेतले. या इंजेक्शनचा पुरवठा नेमका कोठून होत होता, त्याची विक्री कोणाला केली जात होती आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली असून, औषधांच्या अनधिकृत व्यापाराचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560






