पालकांच्या पाठपुराव्याला मोठे यश! हातवळण शाळेत अखेर शिक्षक रुजू १२० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी!

 

हातवळण शाळेला अखेर शिक्षक; पालकांच्या पाठपुराव्याला यश*

 

प्रतिनिधी – योगेश राऊत

हातवळण, ता. दौंड :* येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकपद नोव्हेंबर २०२५ पासून रिक्त होते. तत्कालीन शिक्षक महादेव खळदकर यांची बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर पवित्र पोर्टलद्वारे पदवीधर शिक्षक अक्षय गवळी यांची नियुक्ती झाली. गवळी दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी शाळेत रुजू झाले. विद्यार्थ्यांनी ढोल-लेझीमच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकपद रिक्त झाल्यानंतर पालक व ग्रामस्थांनी नियुक्तीसाठी पाठपुरावा केला. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी १०० पालकांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी यांना देण्यात आले. पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेतून गवळी यांची नियुक्ती झाली.

 

गवळी यांचे गणित व विज्ञान विषयात विशेष प्रावीण्य असून, या विषयांच्या अध्यापनासाठी शाळेला नवीन शिक्षक उपलब्ध झाला आहे.

 

यावेळी नवनियुक्त केंद्रप्रमुख उमेश उंदरे, मुख्याध्यापक आढागळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शितोळे, सदस्य ज्ञानेश्वर राऊत व उमेश जगताप उपस्थित होते. समितीच्या वतीने अध्यक्ष शितोळे यांनी गवळी व उंदरे यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक आढागळे यांनी गवळी यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

 

मुख्याध्यापक आढागळे म्हणाले, “रिक्त पद भरल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनाला आवश्यक शिक्षक उपलब्ध झाला आहे. गणित व विज्ञान विषयातील गवळी यांच्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना लाभ होईल.”

 

केंद्रप्रमुख उमेश उंदरे यांनी गणित व विज्ञान विषयातील विशेष ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

दरम्यान, उंदरे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत सुमारे एक तास वर्गात प्रत्यक्ष अध्यापन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची अध्ययन पातळी व विषयाचे आकलन जाणून घेतले.

 

पालक प्रवीण फडके म्हणाले, “शिक्षकपद रिक्त झाल्यानंतर पालक व ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. १०० पालकांच्या स्वाक्षरीचे निवेदनही देण्यात आले. आता शिक्षक उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.”

 

यावेळी शिक्षक दिलीप साळुंखे, रावसाहेब घोरपडे, साळुंखे मॅडम व महादेव भालेराव तसेच पालक उमेश जगताप उपस्थित होते.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *