संत निळोबारायांच्या जन्मभूमीत गाथा मंदिराच्या संगमरवरी बांधकामाचा शुभारंभ
Rjnews27 मराठी – शिरूर
जन्मतिथीचा पवित्र योग साधत पहिली संगमरवरी शिळा विराजमान; हजारो वारकरी-भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण
रांजणगाव गणपती–खंडाळे : संत परंपरेतील थोर संत आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या संत निळोबारायांच्या ३५१व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत त्यांच्या जन्मभूमीत संत निळोबाराय गाथा मंदिराच्या संगमरवरी बांधकामाचा शुभारंभ मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आला. जन्मतिथीच्या पवित्र दिवशी मंदिराची पहिली संगमरवरी शिळा बसविण्यात आल्याने रांजणगाव गणपती–खंडाळे परिसरात वारकरी भक्तीचा आणि अध्यात्माचा जागर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
संत निळोबारायांचा जन्म शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती–खंडाळे परिसरात झाला असून त्यांनी या परिसरात तब्बल ३२ वर्षे वास्तव्य केले. संत निळोबारायांच्या पावन स्मृतींना चिरंतन स्वरूप देण्याबरोबरच त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा आणि वारकरी परंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने त्यांच्या जन्मभूमीत भव्य गाथा मंदिर उभारण्याचा निर्णय वारकरी संप्रदायाने डिसेंबर २०२५ मध्ये घेतला.
सुमारे १० कोटी रुपये खर्चाचे हे भव्य मंदिर पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये उभारण्यात येत आहे. मंदिराच्या बांधकामासाठी काळ्या पाषाणातील फाउंडेशनचे काम पूर्ण झाले असून आता मंदिराच्या पुढील बांधकामाला प्रारंभ झाला आहे. जन्मतिथीच्या दिवशी पहिली संगमरवरी शिळा बसवून या महत्त्वपूर्ण धार्मिक वास्तूच्या बांधकामाचा श्रीगणेशा करण्यात आला.
हभप ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली), संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप पुंडलिक महाराज देहूकर, श्रीगुरु नंदकिशोर दादा वाघमारे, संत निळोबारायांचे वंशज हभप गोपाळकाका मकाशीर, दामोदरकाका मकाशीर तसेच हभप दिगंबर महाराज नरवडे यांच्या शुभहस्ते मंदिराची पहिली संगमरवरी शिळा बसविण्यात आली.
या सोहळ्याला भक्ती आणि अध्यात्माची जोड देत हभप ज्ञानेश्वर महाराज कदम आणि हभप पुंडलिक महाराज देहूकर यांची दोन दिवस कीर्तनसेवा पार पडली. संतांच्या विचारांचे स्मरण, हरिनामाचा गजर आणि कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांनी अध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतला. परिसरात निर्माण झालेले भक्तिमय वातावरण आणि वारकऱ्यांची मोठी उपस्थिती यामुळे जन्मभूमीचा परिसर जणू भक्तीमय झाला होता.
मंदिर संस्थानच्या नियोजनासाठी समित्यांची स्थापना
संत निळोबाराय गाथा मंदिराच्या पुढील कामकाजासाठी १०८ सदस्यांची आजीवन नियोजन समिती तसेच २१ विश्वस्तांची मुख्य विश्वस्त कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. मंदिराच्या बांधकामासोबतच भाविकांसाठी आवश्यक धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने या समित्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
यावेळी हभप संतोष ज्ञानेश्वर रासकर, हभप शामकांत महाराज साठे, हभप सत्यवान तुकाराम कदम, हभप मधुकर यशवंत भूमकर, हभप रावसाहेब जयवंत नरवडे आणि हभप शहाजी महाराज जगताप यांची आजीवन नियोजन समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
तसेच गोपाळकृष्ण रामचंद्र दंडवते यांची मुख्य विश्वस्त कमिटीमध्ये पहिले विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
विविध तालुक्यांतून वारकरी-भाविकांची मांदियाळी
संत निळोबारायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक सोहळ्यास शिरूर तालुक्यासह हवेली, दौंड, खेड, जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, बारामती आणि मावळ तालुक्यांमधून हजारो वारकरी व भाविक उपस्थित होते.
संतांच्या जन्मभूमीत उभे राहणारे हे गाथा मंदिर केवळ धार्मिक वास्तू न राहता संत निळोबारायांच्या अध्यात्मिक विचारांचे, वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे आणि भक्तीमार्गाचे केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी भावना या सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आली.
जन्मतिथीच्या पावन दिवशी संगमरवरी शिळा बसवून सुरू झालेल्या या मंदिराच्या बांधकामामुळे संत निळोबारायांच्या जन्मभूमीला धार्मिक आणि आध्यात्मिक वारशाचे नवे अधिष्ठान मिळण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







