शिरूर प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी लहू शितोळे यांची एकमताने निवड

शिरूर प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी लहू शितोळे यांची एकमताने निवड.

Rjnews27 मराठी – रमेश बनसोडे

महिला आघाडीच्या अध्यक्षपदी आरती दरेकर; शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याला प्राधान्य देणार – लहू शितोळे

शिरूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, उपशाखा शिरूरच्या तालुकाध्यक्षपदी टाकळी हाजी येथील ज्येष्ठ शिक्षक नेते लहू मनाजी शितोळे यांची एकमताने निवड करण्यात आली. रांजणगाव गणपती येथे आयोजित करण्यात आलेल्या शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ही निवड करण्यात आली.

लहू शितोळे हे शिरूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटनेच्या कार्यात दीर्घकाळापासून सक्रिय असून, शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच संघटनात्मक कार्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून त्यांची संघटनेत ओळख आहे.

या अधिवेशनात महिला आघाडीच्या अध्यक्षपदी आरती दरेकर यांचीही निवड करण्यात आली. संघटनेच्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने विविध पदाधिकारी व शिक्षक नेत्यांच्या उपस्थितीत संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

अधिवेशनासाठी वरिष्ठ निरीक्षक म्हणून जिल्हा संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांच्यासह संतोष पानसरे, वैभव सदाकाळ, बापूसाहेब लांडगे, माऊली पुंडे, सुरेश सातपुते आणि उत्तम भंडारे यांनी काम पाहिले.

यावेळी पी. सी. बारहाते, गणेश काळे, प्रवीण गायकवाड, सुनील साठे, माऊली कुरंदळे, सतीश पाचरणे, संतोष शेवाळे, सुनील शेळके, जयवंत भुजबळ, संजय कुमार वाळके, वि. ना. पवार, आबा जाधव, कैलास सोदक, संतोष थोपटे, साधना शिंदे, नयना अरगडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष लहू शितोळे यांनी यावेळी बोलताना शिक्षकांच्या अडचणी आणि विविध प्रलंबित प्रश्न समजून घेऊन ते शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष गावडे यांनी केले, तर आप्पासाहेब रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. अधिवेशनात लहू शितोळे यांच्या निवडीचे उपस्थित शिक्षक व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *