सातारा-लोणंद मार्गावरील दोन ऐतिहासिक पुलांवर अवजड वाहतुकीला ब्रेक

सातारा-लोणंद मार्गावरील दोन ऐतिहासिक पुलांवर अवजड वाहतुकीला ब्रेक

 

वाढे व वडूथजवळील वेण्णा-कृष्णा नदीवरील जुन्या दगडी कमानीच्या पुलांची संरचनात्मक स्थिती खालावली; 20 जून 2027 पर्यंत वाहतूक नियोजन

 

प्रतिनिधी- विकास साळुंके 

 

सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील वाढे आणि वडूथ गावाजवळील वेण्णा व कृष्णा नदीवरील ऐतिहासिक दगडी कमानीच्या पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात पुलांची संरचनात्मक स्थिती खालावल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही पुलांवरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय सातारा पोलिसांकडून घेण्यात आला आहे.

 

या वाहतूक नियोजनाची अंमलबजावणी 28 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून ते 20 जून 2027 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा-लोणंद तसेच सातारा-फलटण मार्गावरून प्रवास करणाऱ्या अवजड वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

 

पुलांच्या पाहणीत काय आढळले?

 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) दोन्ही पुलांची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान पुलांमध्ये पाणी पाझरणे, किरकोळ संरचनात्मक तडे तसेच कमानीच्या भागात झीज झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अवजड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

 

लोणंदकडून साताऱ्याकडे येणारी अवजड वाहने खंडाळा, शिरवळमार्गे पुणे-बंगळूर महामार्गावरून साताऱ्याकडे वळवण्यात येणार आहेत.

 

त्याचप्रमाणे साताऱ्याकडून वाढे फाटामार्गे लोणंद व फलटणकडे जाणारी अवजड वाहनेही पुणे-बंगळूर महामार्गावरून खंडाळा-शिरवळमार्गे पुढे जातील.

 

साताऱ्याकडून फलटणकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी बॉम्बे रेस्टॉरंट चौक–कोरेगाव–पुसेगाव–ताथवडे घाट हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. फलटणकडून साताऱ्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांनाही याच मार्गाचा वापर करता येणार आहे.

 

आदर्कीमार्गे येणाऱ्या वाहनांसाठीही पर्यायी व्यवस्था

 

आदर्कीमार्गे येणाऱ्या अवजड वाहनांसाठी आदर्की फाटा–वाठार–पिंपोडे बु.–सर्कलवाडी–शिरगाव घाट–जोशी विहीर मार्गे पुणे-बंगळूर महामार्गावर जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

 

तसेच आदर्की फाटा–लोणंद–खंडाळा–शिरवळ मार्गेही पुणे-बंगळूर महामार्गावर जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

एसटी, स्कूल बस आणि आवश्यक सेवांना परवानगी

 

महत्त्वाची बाब म्हणजे एसटी बसेस, स्कूल बसेस तसेच आवश्यक सेवांशी संबंधित जड वाहनांना या दोन्ही पुलांवरून ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 

दरम्यान, हलकी वाहने व इतर सामान्य वाहतुकीवर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हलक्या वाहनांची वाहतूक पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.

 

नवीन समांतर पुलांचे काम सुरू

 

या दोन्ही जुन्या पुलांना पर्याय म्हणून नवीन समांतर पुलांचे बांधकाम NHAIकडून सुरू आहे. नवीन पूल पूर्ण झाल्यानंतर जुन्या पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

वाहतूक नियोजनामुळे अवजड वाहनांना काही अतिरिक्त अंतराचा प्रवास करावा लागणार असला तरी पुलांची सुरक्षितता लक्षात घेता वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Rjnews 27 मराठी | आपले गाव, आपली बातमी

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *