वाणेवाडीत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचा २२ वा वर्धापनदिन उत्साहात
ज्येष्ठांच्या हक्कांसह शासकीय योजनांची माहिती; ग्रामपंचायतीकडून काठ्यांचे वाटप
प्रतिनिधी – योगेश राऊत
वाणेवाडी (ता. बारामती) : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासोबतच त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती, शासकीय योजनांची माहिती आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्याशी संलग्न व मान्यताप्राप्त नोंदणीकृत श्री सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, वाणेवाडी यांचा २२ वा वर्धापनदिन मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग लाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास महासंघाचे उपाध्यक्ष आनंदराव शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रमेश शिळीमकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या समस्या, हक्क आणि कल्याणकारी योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग लाड, उपाध्यक्ष आनंदराव शिंदे, श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ, कोळकी (ता. फलटण)चे सचिव बाबुराव ढमाळ, नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, पाटसच्या सभासद सौ. विजया लाड तसेच वाणेवाडीचे ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वाणेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना काठ्यांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आधार मिळावा आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन सामाजिक पातळीवर मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमात संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर जगताप तसेच श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ, कोळकीचे सचिव बाबुराव ढमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांनी समाजासाठी दिलेले योगदान, त्यांच्या अनुभवाचे महत्त्व, त्यांच्या अडचणी आणि समाजाने ज्येष्ठांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन याबाबत त्यांनी विचार मांडले.
दरम्यान, आनंदराव शिंदे आणि डॉ. पांडुरंग लाड यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, विधवा व परित्यक्ता महिलांसाठीच्या विविध योजना, आयुष्मान भारत आरोग्य योजना, आयुष्मान वय वंदना योजना तसेच आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठीच्या अधिनियमाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
शासकीय योजनांचा लाभ घेताना आवश्यक कागदपत्रे, योजनांची माहिती योग्य पद्धतीने समजून घेणे, ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध असलेले हक्क तसेच आरोग्यविषयक सुविधांचा योग्य उपयोग करण्याबाबतही यावेळी प्रबोधन करण्यात आले. आयुष्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठ नागरिकांनी आनंदी, निरोगी आणि समाधानाचे जीवन जगण्यासाठी आरोग्याची काळजी, सामाजिक सहभाग आणि उपलब्ध सुविधांचा उपयोग करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शनातून सांगण्यात आले.
या वर्धापनदिन सोहळ्याच्या यशस्वितेसाठी श्री सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंतराव भोसले, उपाध्यक्ष मनोहर जगताप, सचिव गोविंदराव चव्हाण, पोपटराव भोसले तसेच संघाच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी संघाचे सचिव गोविंदराव चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना अल्पोपहार देऊन वर्धापनदिन सोहळ्याचा उत्साहात समारोप झाला.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







