पुणे रेल्वे स्टेशनवर ‘स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६’ उत्साहात संपन्न
Rjnews27 मराठी
स्वच्छता रॅलीत अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांचा उत्स्फूर्त सहभाग; कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्त प्रवास व पाणी बचतीचा संदेश
पुणे (प्रतिनिधी) : पुणे रेल्वे स्टेशनवर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. स्वच्छ पखवाड्याच्या निमित्ताने दि. १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध स्वच्छता व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून पुणे रेल्वे स्टेशनवर स्वच्छता विषयक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी तथा जिल्हा आयकॉन मदन रामनाथ लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे रेल्वे स्टेशनचे डायरेक्टर नरेंद्र ढवळे, एडीएमई रवि कावडे, मुख्य स्वास्थ्य निरीक्षक जितेंद्र कुमार मौर्य, सीसीआय हुकुमचंद मीना, शिव बहादुर सिंग, आयपीएफ सुनील कुमार यादव, एचई अभिजित केसरी, सीपीएस प्रसाद जोशी, सीबीएस संजय सर्वोत्तम, डेप्युटी एसएस कमर्शियल मुनेश्वर रजाक, डीसीटीआय जन राव, स्टेशन मॅनेजर रविंद्र धुमाळ, हाऊसकिपिंग सुपरवायझर विजय शिरोळे, तसेच किशोर टिकुटे, नितेश बराटे, गणेश गायकवाड, राजेंद्र ठोंबरे, अतुल शिरोळे यांच्यासह आरपीएफ स्टाफ आणि रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.
‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’च्या घोषणांनी रेल्वे परिसर दुमदुमला
अभियानाची सुरुवात स्वच्छता विषयक जनजागृती रॅलीने करण्यात आली. पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकपासून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर मुख्य गेट व सर्क्युलेटिंग एरियामधून रॅली पुढे नेण्यात आली. यावेळी ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ अशा घोषणांनी रेल्वे परिसर दुमदुमून गेला.
या रॅलीमध्ये रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवाशांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला. रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ रेल्वे प्रशासनाची नसून, प्रत्येक प्रवाशानेही त्यामध्ये आपला सहभाग नोंदविणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कचरा वर्गीकरणाचा प्रवाशांना संदेश
यावेळी विविध प्रवाशांनी रेल्वे स्थानकातील स्वच्छतेबाबत आपले अभिप्राय नोंदविले. रेल्वे कर्मचारी स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना प्रवाशांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
रेल्वे स्थानकावर कचरा इतरत्र न फेकता ओला आणि सुका कचरा संबंधित वर्गीकृत डस्टबिनमध्येच टाकावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असा संदेश देण्यात आला.
‘भारतीय रेल ही आपली संपत्ती आहे’ या भावनेतून रेल्वेचा वापर करावा आणि सार्वजनिक मालमत्तेची स्वच्छता व सुरक्षितता जपावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
नाटिकेतून ओला-सुका कचरा वर्गीकरणाची जनजागृती
अभियानादरम्यान मदन रामनाथ लाठी यांनी नाटिकेच्या माध्यमातून प्रवाशांना कचरा वर्गीकरणाबाबत प्रभावीपणे माहिती दिली. केळीचे साल, शिळे अन्न यांसारखा ओला कचरा हिरव्या डस्टबिनमध्ये, तर बिस्कीट व चिप्सचे रॅपर, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या यांसारखा सुका कचरा निळ्या डस्टबिनमध्ये टाकावा, असे प्रात्यक्षिकातून समजावून सांगण्यात आले.
कचरा कुठेही न टाकता योग्य डस्टबिनचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रवासादरम्यान सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळून त्याऐवजी कापडी पिशवीचा वापर करण्याचा प्रयत्न करावा, असेही आवाहन करण्यात आले.
‘कॅच द रेन’च्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश
स्वच्छतेसोबतच पाणी बचतीचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत ‘रेन हार्वेस्टिंग – कॅच द रेन’ या संकल्पनेची माहिती प्रवाशांना देण्यात आली.
स्वच्छ रेल्वे स्थानक, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, प्लास्टिकचा कमी वापर, पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धन या विविध संदेशांमधून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा उद्देश प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात आला.
रेल्वे प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेला प्रवाशांनीही सक्रिय सहकार्य केल्यास पुणे रेल्वे स्थानक अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यास निश्चितच मदत होईल, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







