राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त युवकांना लोकशाही सहभागाचा संदेश

मांडवगण फराटा : प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी

मांडवगण फराटा येथील श्री वसंतराव फराटे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २४ सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ‘युवाशक्ती, राष्ट्रीय सेवा योजना आणि लोकशाहीतील मतदारांची भूमिका’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीसोबतच लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. रामदास गांगुर्डे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रविण कुरुमकर होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच झाडाच्या रोपट्यास जलअर्पण करून करण्यात आली. या उपक्रमामुळे सामाजिक सेवा, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रीय बांधिलकीचा संदेश देत कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली.

 

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. रामदास गांगुर्डे यांनी भारताच्या लोकशाही व्यवस्थेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “भारत हा तरुणांचा देश आहे आणि देशाचे भवितव्य युवाशक्तीच्या हातात आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ समाजसेवेची आवड निर्माण होत नाही, तर नेतृत्वगुण आणि नागरिकत्वाची जाणीवही विकसित होते.”

 

आजच्या डिजिटल युगात युवकांनी माहितीच्या प्रवाहात सजग आणि जबाबदार नागरिक म्हणून भूमिका बजावणे आवश्यक आहे. लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी युवकांनी जागरूक राहण्याबरोबरच मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. केवळ हक्कांची भाषा न करता आपल्या घटनात्मक अधिकारांचा जबाबदारीने वापर करणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे. विशेषतः युवा मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. गांगुर्डे यांनी केले.

 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रा. डॉ. प्रविण कुरुमकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यपरंपरेचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात एन.एस.एस. आणि राज्यशास्त्र विभागाचे महत्त्व अधोरेखित केले. “पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना समाजातील वास्तवाची जाणीव करून देणे हे महाविद्यालयाचे ध्येय आहे. ‘मी नाही तर तुम्ही’ (Not Me But You) हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य विद्यार्थ्यांनी आचरणात आणून सामाजिक तसेच लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा,” असे त्यांनी सांगितले.

 

युवकांनी सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील राहण्याबरोबरच जागरूक मतदार म्हणून आपली भूमिका बजावणे आवश्यक आहे. आगामी काळात प्रत्येक विद्यार्थ्याने लोकशाहीच्या प्रक्रियेत जबाबदारीने सहभागी होत आपल्या मतदानाच्या अधिकाराचा योग्य वापर करावा, असे आवाहनही प्राचार्य डॉ. कुरुमकर यांनी केले.

 

कार्यक्रमास प्राचार्य प्रा. डॉ. प्रविण कुरुमकर, डॉ. रामदास गांगुर्डे, प्रा. रमेश शितोळे, प्रा. निनाद पाडळे, प्रा. अश्विनी शिंदे, प्रा. हर्षदा नागवडे, प्रा. अस्मिता माने, प्रा. वृषाली लगड, प्रा. प्रगती क्षीरसागर यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जयराम पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. हेमंत कुदळे यांनी केले, तर प्रा. आशिष काटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थी, स्वयंसेवक आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *