सिमेंट कंपनीलगतच्या ओढ्यावरील अतिक्रमण हटवा; प्रदूषणामुळे भीमा नदीच्या पाण्यावरही परिणाम होत असल्याचा आरोप

कानगाव-पाटस हद्दीतील प्रकार; वन्यजीव, जलचर आणि शेती धोक्यात आल्याचा रयत क्रांती संघटनेचा दावा
दौंड : प्रतिनिधी – विकास साळुंके
कानगाव व पाटस हद्दीत असलेल्या श्री सिमेंट कंपनीलगतच्या ओढ्यावर करण्यात आलेले कथित अतिक्रमण तसेच सिमेंट धुळीमुळे होणारे प्रदूषण तातडीने थांबवून संबंधित ठिकाणी प्रशासनाने पाहणी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी दौंड तहसीलदार अरुण शेलार, दौंडचे प्रांत अधिकारी तसेच वन अधिकारी श्री. काळे यांना लेखी निवेदन दिले आहे.
शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, श्री सिमेंट कंपनीलगतच्या ओढ्यावर सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात चार ते पाच ठिकाणी स्लॅब टाकून पूल व रस्ते तयार करण्यात आले आहेत. या बांधकामांमुळे ओढ्याच्या परिसरातील वन्यप्राण्यांच्या हालचालींच्या मार्गात अडथळे निर्माण होत असून, ओढ्यालगत असलेल्या जलचर प्राणी, पशुपक्षी आणि इतर जैवविविधतेवर परिणाम होत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
कंपनी परिसरातून मोठ्या प्रमाणात सिमेंटची धूळ ओढ्यात मिसळत असल्याने ओढ्याचे पाणी दूषित होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रदूषणामुळे जलचर जीव बाधित होत असून काही जलचर मृत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय कंपनी परिसरातील सिमेंटची धूळ व इतर प्रदूषित घटक ओढ्याच्या माध्यमातून पुढे कानगाव व मांडवगण परिसरातील भीमा नदीमध्ये जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असून, कानगाव, मांडवगण, बाभूळसर तसेच गार परिसरातील शेती आणि नागरिकांच्या आरोग्याबाबतही चिंता निर्माण झाल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. पाळीव प्राणी, पशुपक्षी आणि जलचरांवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
या प्रश्नाबाबत रयत क्रांती संघटनेच्या वतीने यापूर्वीही संबंधित कंपनीविरोधात अनेक वेळा निवेदने, आंदोलने आणि उपोषणे करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनीही हा विषय नुकत्याच झालेल्या राज्याच्या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मांडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, यानंतरही कंपनी परिसरातील कथित अतिक्रमण आणि प्रदूषणाच्या प्रश्नावर अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेने केला आहे. संबंधित कंपनीला नेमका कोणाचा राजाश्रय आहे, याबाबत परिसरात चर्चा सुरू असल्याचेही शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, ओढ्यावरील कथित अतिक्रमण, प्रदूषण तसेच वन्यजीव आणि जलस्रोतांवर होत असल्याच्या परिणामांची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी आणि दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी भानुदास शिंदे यांनी केली आहे. या प्रकरणी प्रशासनाच्या पाहणी व पुढील कारवाईकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
— भानुदास शिंदे
राज्य प्रवक्ते, रयत क्रांती संघटना
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







