नागरगावात दोन विद्युत ट्रान्सफार्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी; ८४ हजारांचा मुद्देमाल लंपास

नागरगावात दोन विद्युत ट्रान्सफार्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी; ८४ हजारांचा मुद्देमाल लंपास

 

शिरूर : प्रतिनिधी – विजय कांबळे

 

शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे नागरगाव येथे अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मालकीचे दोन विद्युत ट्रान्सफार्मर खाली पाडून त्यातील ऑईल सांडत मोठे नुकसान केले. त्यानंतर दोन्ही ट्रान्सफार्मरमधील तब्बल १४० किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून २२ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारांची अंदाजे किंमत ८४ हजार रुपये असल्याचे समोर आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नागरगाव परिसरातील ‘पांढरे नंबर २’ नावाचा १००/२२ केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर, डी.टी.सी. क्रमांक ४०५५६५५, अज्ञात चोरट्यांनी खाली पाडला. या ट्रान्सफार्मरमधून अंदाजे ८० किलो तांब्याच्या तारा काढून चोरी करण्यात आली. तसेच ‘किसन शेलार’ नावाचा २५/२२ केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर, डी.टी.सी. क्रमांक एच.जी. २१२४२, यामधून अंदाजे ६० किलो तांब्याच्या तारा चोरून नेण्यात आल्या.

 

चोरट्यांनी ट्रान्सफार्मर खाली पाडल्याने त्यातील ऑईल सांडले असून, विद्युत उपकरणांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे तांब्याच्या तारांच्या चोरीबरोबरच ट्रान्सफार्मरचे अतिरिक्त नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

 

याप्रकरणी फिर्यादी सुरज शंकर लोहारे, रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ८४३/२०२६ नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथकाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. पो.हवा./२४६३ शिंदे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. चोरीच्या या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे, तसेच चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *