न्हावरे येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल
Rjnews 27 मराठी – बालाजी कांबळे
शिरूर : शिरूर तालुक्यातील न्हावरे गावच्या हद्दीतून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला कोणीतरी फूस लावून अथवा अन्य प्रकारे तिच्या इच्छेविरुद्ध घेऊन जाऊन अज्ञात ठिकाणी बेकायदेशीररीत्या ठेवले असावे, असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास न्हावरे गावच्या हद्दीतील सातकर हॉस्पिटलसमोरून सदर १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. बराच शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात रात्री सुमारे १०.०५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
बेपत्ता तरुणीचे वय १८ वर्षे २ महिने असून, तिचा रंग गोरा, उंची अंदाजे ५ फूट २ इंच आहे. तिच्या डाव्या डोळ्यावर कृत्रिम डोळा बसवलेला असल्याने तिची ओळख पटविण्यासाठी हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ती बेपत्ता झाली त्यावेळी तिच्या अंगात लाल रंगाची साडी, चॉकलेटी रंगाचा स्टॉल आणि पायात गुलाबी रंगाच्या सँडल होत्या.
घटनेनंतर शिरूर पोलिसांनी तरुणीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. तसेच तिच्यासोबत नेमके काय घडले आणि तिला कोणी व कोणत्या कारणासाठी घेऊन गेले, याबाबत पोलिसांकडून विविध दिशांनी तपास करण्यात येत आहे. अज्ञात व्यक्तीचा तसेच बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार भोते करीत असून, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याचे पथक तपास करीत आहे.




