शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात १९ सप्टेंबरला भव्य शेतकरी मेळावा
ऊस व इतर पिक व्यवस्थापनासह कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन
अल्लाउद्दीन अलवी | प्रतिनिधी
श्रीगोंदा, दि. १७ : सहकार महर्षी स्वर्गीय शिवाजीराव नारायणराव नागवडे बापू यांच्या ८व्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने तसेच माननीय अंकुश पाटील (पलूस) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता कारखाना परिसरातील स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या स्मृतिस्थळी हा मेळावा होणार आहे.
या शेतकरी मेळाव्यात ऊस व इतर पिकांचे व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पिकांवरील विविध किडींचे नियंत्रण तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, किडींचा प्रादुर्भाव वेळीच कसा ओळखावा आणि त्यावर प्रभावी नियंत्रण कसे मिळवावे, यासह शेतीशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा शिवाजीराव नागवडे राहणार असून, प्रमुख मार्गदर्शन अंकुश पाटील (पलूस) यांचे लाभणार आहे. तसेच कारखान्याच्या व्हा. चेअरमन मेघा संदीपराव औटी यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्वर्गीय शिवाजीराव नारायणराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून, ऊस उत्पादनात येणाऱ्या विविध अडचणींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या स्मृतिस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







