जागतिक महिला दिनानिमित्त कांचन रिसॉर्ट येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच अमरावतीचा उपक्रम; गायन, नृत्य, कविता व व्याख्यानाने रंगणार सोहळा
Rjnews 27 मराठी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच, अमरावती यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता शहरातील कांचन रिसॉर्ट येथे हा कार्यक्रम होणार असून, महिला सक्षमीकरणासह त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महिलांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, उद्योग, पत्रकारिता, कला, क्रीडा, स्वयंरोजगार तसेच विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अशा कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला मंचाच्या पुढाकाराने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमादरम्यान महिलांवर आधारित गीतगायन, नृत्य, कवितांचे सादरीकरण तसेच मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, उपस्थितांसाठी हा सोहळा विविधांगी कार्यक्रमांनी रंगणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शोभना देशमुख राहणार असून, विशेष उपस्थिती म्हणून आमदार सुलभाताई खोडके उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रीती देशमुख (प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा – DRDA), डॉ. अनुभूती पाटील (सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ), सुरेखा लुंगारे (नगरसेविका), राजश्री जडाळे (संचालक, महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, अमरावती), अक्षरा लहाने (महिला मंच, पश्चिम विदर्भ कार्याध्यक्षा, अचलपूर) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफभाई खान आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. माया बोरखडे – आयुर्वेद क्षेत्र, हर्षी ढोक – क्रीडा क्षेत्र, कांता काळे – आरोग्य सेवा, कहुता घाटोळ – उद्योग क्षेत्र, श्रुतिका तायडे – उद्योजकता, कांचन उरले – उद्योग क्षेत्र, कविता बोंडे – समुपदेशन, मीना राहिंग – पत्रकारिता, वैशाली बरडे – स्वयंरोजगार व उद्योग, आदिती मेहता – नृत्यकला, गौरी सतके – गायन, डॉ. प्राचार्या मंजुषा सागर बडकी – शिक्षण क्षेत्र आणि सुयोगा संतापे – लेखन क्षेत्र आदी महिलांचा गौरव करण्यात येणार आहे.
महिलांच्या योगदानाला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न
समाजाच्या विविध स्तरांवर महिलांनी बजावलेल्या योगदानाची दखल घेणे आणि त्यांच्या कार्यातून इतर महिलांना प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमामागील प्रमुख हेतू आहे. ग्रामीण भागातील महिला, उद्योजिका, शिक्षिका, कलाकार, पत्रकार, आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला मंचाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच, अमरावती यांच्या वतीने करण्यात आले आहे.





