हवेलीच्या विकासाला मिळणार नवी गती; ५.५५ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे
रस्ते, पाणी, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि पालखी मार्गांना प्राधान्य; आमदार माऊली आबा कटके यांच्या उपस्थितीत विविध कामांचे भूमिपूजन

हवेली : हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी पंचायत समिती हवेली, जिल्हा नियोजन समिती तसेच विविध विकास निधीतून तब्बल ५५५.२३ लाख रुपये अर्थात ५ कोटी ५५ लाख २३ हजार रुपयांच्या विकासकामांना शनिवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध गावांमध्ये या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या विकासकामांमध्ये आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कोलवडी, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या गावांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

रस्ते दुरुस्ती व मजबुतीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, विविध पायाभूत सुविधा तसेच पालखी मार्गांच्या विकासावर या कामांमध्ये विशेष भर देण्यात आला आहे. वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर गावांमधील पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

या वेळी पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच संबंधित गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“हवेली तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास हा आमचा प्राधान्यक्रम आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हवेलीच्या विकासाची ही गती यापुढेही कायम राहील,” असे आमदार माऊली आबा कटके यांनी सांगितले.
कुंजीरवाडीतील जनसंपर्क कार्यालयाची पाहणी
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गालगत कुंजीरवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन जनसंपर्क कार्यालयाची आमदार माऊली आबा कटके यांनी पाहणी केली. नागरिकांना आपल्या समस्या, अडचणी तसेच विकासकामांबाबत थेट संवाद साधता यावा, या उद्देशाने हे कार्यालय लवकरच नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
“शिरूरसह हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी पायाभूत विकासकामांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काळात हवेलीच्या विकासासाठी आणखी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून, गावागावात विकासाची कामे पोहोचविण्याचे काम अधिक गतिमान केले जाईल,” असे कटके यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या या विकासकामांमुळे हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कमी होऊन गावांच्या विकासाला अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.




